नायगावमध्ये महिला पोलिस कॉन्स्टेबलने केली आत्महत्या

नायगाव येथील पोलिस वसाहतीत महिला पोलिस कॉन्स्टेबलने गळफास लावून आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. मंजू गायकवाड (२२) असं या महिला कॉन्स्टेबलचं नाव असून, त्या एल. ए. (शस्त्रास्त्र विभाग)मध्ये भरती होत्या.

प्रेमसंबंधातून आत्महत्या?

सांगितलं जातंय, कि पोलिस वसाहतीत राहाणाऱ्या एका मुलासोबत मंजूचं नातं होतं. तिच्या कुटुंबियांना देखील याची माहिती होती. मात्र, मुलाने लग्नाला नकार दिल्याची माहिती मंजू यांच्या बहिणीने भोईवाडा पोलिसांना दिली आहे. या तरुणाला सध्या पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मुलाचे वडील हे देखील पोलिस खात्यात पोलिस उपनिरीक्षक असल्याचं समजतंय.

राहत्या घरीच घेतला गळफास

२०१४ साली पोलिसात भरती झालेल्या मंजूची एल. ए. मध्ये नियुक्ती करण्यात आली होती. नायगाव येथील न्यू बीडीडी चाळीत मंजू गायकवाड आपल्या दोन बहिणी आणि भावासोबत राहत होती. मंगळवारी सकाळी मंजूची बहीण भावाला डब्बे देण्यासाठी गेली होती. सकाळी साडे-अकराच्या सुमारास बहीण परतल्यावर तिला मंजू पंख्याला लटकलेल्या अवस्थेत दिसली. पंख्याला साडी बांधून मंजूने गळफास घेतला होता. तात्काळ बहिणीने खाली राहाणाऱ्या तिसऱ्या बहिणीच्या आणि शेजारच्यांच्या मदतीने मंजुला खाली काढले आणि केईम रुग्णालयात नेले, जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

घटनास्थळावरून आम्हाला कोणतीही सुसाईड नोट मिळालेली नसून आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. सध्या सगळ्या बाजूने आमचा तपास सुरू असल्याचं भोईवाडा पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय पाटील यांनी सांगितलं आहे.


हेही वाचा

'ब्लू फिल्म्स' दाखवून केला स्वत:च्याच मुलीवर बलात्कार

पुढील बातमी
इतर बातम्या