‘कौमार्य चाचणी’ केल्यास नोंदवला जाणार गुन्हा

भटक्या विमुक्त जमातीतील समाजात आजही लग्नानंतर कौमार्य चाचणी घेण्याची प्रथा रूढ आहे. २१ व्या शतकातही सुरू असलेल्या अशा प्रकारच्या प्रथेमुळे अनेक मुलींची घरं उध्वस्त होत आहेत. ते रोखण्यासाठी सरकारनं पाऊलं उचलण्यास सुरूवात केली आहे. यापुढे राज्यात कुठल्याही विवाहितेला कौमार्य चाचणीस भाग पाडणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी दिले आहेत. या कौमार्य चाचणी विरोधात राज्यशासनाकडून लवकरच अधिसूचनाही काढण्यात येणार आहे.

स्त्रियांची कौमार्य चाचणी

२१ व्या शतकातही खेड्यापाड्यांतील कंजारभाट जमातीत स्त्रियांची कौमार्य चाचणी घेतली जात होती. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. यावर आता शासनाने कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. नुकतीच मंत्रालयात शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांच्या पुढाकाराने गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जात पंचायती विरोधी समिती सदस्य आणि सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींची जात पंचायतीच्या जाचक रुढीबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. ज्या जमाती स्त्रियांना अपमानजनक वागणूक देतात त्यांच्या विरोधात कडक पाऊले उचलण्याचा निर्णय या बैठकित घेण्यात आला आहे.

दोषींवर कारवाई

कौमार्य चाचणी करणाऱ्या जमातीत या अनिष्ट रुढीला थारा देणाऱ्यांविरोधात (महिला अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत) गुन्हा नोंदवण्याचे आदेश पाटील यांनी दिले. याशिवाय आता दर २ महिन्यांनी राज्यातील सर्व जिल्ह्यांत महिला अत्याचाराच्या प्रकरणांचा आढावा घेऊन दोषींवर कारवाई करण्याचा पाठपुरावा केला जाणार आहे.


हेही वाचा -

डॉक्टरनेच केला नर्सचा विनयभंग


पुढील बातमी
इतर बातम्या