तो तिला रंडी म्हणाला...पण निर्ढावलेला समाज मात्र गप्पच!

  • रुपाली शिंदे & मुंबई लाइव्ह टीम
  • क्राइम

२५ वर्षांची आंचल 'मुंबई लाइव्ह'ला संतापात सांगत होती, 'जेव्हा मी त्या वॉचमनला विचारलं, "आप पीके बैठे थे", तो म्हणाला "हाँ तो? हररोज मैं पीता हूँ". जेव्हा सोसायटीच्या चेअरमननं वॉचमनला विचारलं, "क्या तुमने चाकू निकाला? रंडी बोला?" त्यावर वॉचमननं तितक्याच निर्लज्जपणे उत्तर दिलं, "हाँ निकाला, हाँ बोला".....

आंचल कालरा...पेशानं लेखिका आणि फोटोग्राफर असलेली आंचल मुंबईतल्या पेरी क्रॉस रोडच्या सिल्व्हर स्प्रिंग्स सोसायटीमध्ये रहाते. ३ डिसेंबरच्या संध्याकाळी सोसायटीचा वॉचमन राजेशकुमार लालजीप्रसाद निशाद याने तिच्यावर अश्लिल भाषेत शेरेबाजी केली. सोसायटीच्या कमिटी मेंबर्स आणि पोलिसांकडे तिने मदतीची मागणी केली. खूप सारा पाठपुरावा केल्यानंतर अखेर पोलिसांनी राजेशकुमार विरोधात कलम ३५४ अ, ५०९ आणि ५०६(२) अंतर्गत गुन्हा दाखल केला. आपल्याबरोबर काय घडलं, याचा भयानक अनुभव तिनं फेसबुकवर शेअर केला आहे. तिला आलेल्या भयानक अनुभवातून आजची समाजव्यवस्था आणि एकट्या राहाणाऱ्या महिलांची सुरक्षा यावर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

काय घडलं त्या दिवशी?

३ डिसेंबरच्या संध्याकाळी आंचल सोसायटीतून जात असताना गेटवर उभ्या असलेल्या राजेशकुमारने तिच्याविषयी आक्षेपार्ह शब्दांत शेरेबाजी केली. एवढंच नाही, तर थेट चाकू काढून तिला जीवे मारण्याची धमकीही दिली. "मुझे कोई कुछ नहीं कर सकता, मैं तुम्हे गायब कर दूंगा", असा निर्ढावलेपणा त्यानं दाखवला. तो त्या वेळी दारू प्यायला होता. याआधीही राजेशकुमारनं सोसायटीत राहाणाऱ्या अनेक एकट्या महिलांवर अशीच शेरेबाजी केली होती. त्यामुळे आंचलनं त्याच्याविरोधात तक्रार करायचं ठरवलं. पण पुढे जे झालं, ते धक्कादायक होतं...

पोलिस म्हणे तुमचंच चुकलं!

आंचलने फेसबुकवर लिहिलंय की पोलिसांनी उलट तिलाच चार शब्द ऐकवले! तक्रार दाखल करून घ्यायचं तर दूरच, पण "तुम्हीसुद्धा ड्रिंक घेतलंच होतं की!" रविवारी मित्राच्या वाढदिवसाची पार्टी करणं हा ऑनड्युटी ड्रिंक घेऊन महिलांबद्दल अश्लिल शेरेबाजी करणाऱ्या वॉचमनपेक्षा मोठा गुन्हा होता का? असा सवाल आंचलनं विचारलाय.

आंचल म्हणते, "मी १०० नंबरवर कॉल करून मदत मागितली. वांद्रे पोलिस स्टेशन अवघ्या १० मिनिटांच्या अंतरावर होतं. पण पोलिसांना यायला ५० मिनिट लागले. आल्यावर उलट त्यांनी मलाच सांगितलं, 'छोडो जाने दो, पीके बैठा है'!"

सोसायटीने सांगितलं 'दुर्लक्ष करा'!

येनकेनप्रकारे आंचलनं पोलिसांना तक्रार दाखल करून घ्यायला लावली खरी, पण दुसऱ्याच दिवशी तो पुन्हा सोसायटीत दिसला. आता आंचल अधिकच चिंतेत आली. कारण आता राजेशकुमारला तिची सगळी दिनचर्या माहित होती! पण मोठ्या आशेनं सोसायटी कमिटीकडे गेलेल्या आंचलचा भ्रमनिरास झाला. 'तो नेहमी असं करतो. त्यामुळे त्याच्यावर आरडाओरडा करण्यापेक्षा तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करायला हवं होतं. त्यामुळे ही तुमचीही चूक आहे' असा उलट सल्ला त्यांनी दिला.

जेव्हा सोसायटीचे चेअरमन राजेशकुमारला विचारणा करण्यासाठी गेले, तेव्हा तर त्यानं हद्दच केली! आंचल म्हणाली, 'जेव्हा मी त्या वॉचमनला विचारलं, "आप पीके पैठे थे", तो म्हणाला "हाँ तो? हररोज मैं पीता हूँ". जेव्हा सोसायटीच्या चेअरमननं वॉचमनला विचारलं, "क्या तुमने चाकू निकाला? रंडी बोला?" त्यावर वॉचमननं तितक्याच निर्लज्जपणे उत्तर दिलं, "हाँ निकाला, हाँ बोला"....

याआधीही त्यानं केली होती शेरेबाजी...

याआधीही ऑक्टोबर, २०१७मध्ये जेव्हा आंचलचे काही मित्र तिच्या घरी आले, तेव्हाही राजेशकुमारने अश्लिल शेरेबाजी केली होती. तिचे मित्र सोसायटीत जाताना "जाईये जाईये, यहाँ तो बहोत कस्टमर आते हैं' अशा आक्षेपार्ह शब्दांत त्यानं टिप्पणी केली होती.

मानसिकता बदलणार कधी? गुन्हेगारांचीही आणि समाजाचीही?

आंचलच्या प्रकरणात राजेशकुमारच्या विकृत मानसिकतेनं तिच्या माणूस होण्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. फक्त मित्र असणं आणि पार्टीला जाणं हे अनैतिक असू शकतं का? आणि त्याउपर, आंचलच्या वैयक्तिक आयुष्यात अतिक्रमण करण्याचा अधिकार राजेशकुमार आणि त्याच्यासारख्याच विकृत मानसिकतेच्या लोकांना दिला कुणी?

काही वर्षांपूर्वी, ९ ऑगस्ट, २०१२ रोजी पल्लवी पूरकायस्थ या एकट्या राहाणाऱ्या मुलीवर वडाळ्याच्या हिमालया हाईट्स इमारतीच्या वॉचमननं पूर्ण प्लॅन करून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. तिने जोरकसपणे विरोध केल्यामुळे त्यानं तिच्यावर चाकूने वार केले. आणि यात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे राजेशकुमारची विकृती समाजात सगळीकडे आणि अनेकदा दिसत आली आहे.

आणि त्याहून गंभीर म्हणजे, आंचलच्या तक्रारीला सोसायटी आणि पोलिसांनी दिलेला धक्कादायक प्रतिसाद!महिलांच्या सुरक्षेविषयी इतकी असंवेदना आणि औदासीन्य दाखवणाऱ्या समाजाच्या मानसिकतेमध्ये खरंच बदल होणं आवश्यक आहे. नाहीतर समाजात पुरूष असण्याचा माज मिरवणाऱ्या या विकृत जमातीला आवर घालणं कुणालाच शक्य होणार नाही. समाजात असणारी ही विकृती ठेचण्यासाठी समाजानंच पुढाकार घ्यायला हवा.


हेही वाचा

सेक्स वर्कर्सच्या मुलींची 'लालबत्ती एक्स्प्रेस'!

पुढील बातमी
इतर बातम्या