Advertisement

सेक्स वर्कर्सच्या मुलींची 'लालबत्ती एक्स्प्रेस'!


SHARES

त्यांची देहबोली..त्यांचा आवाज..त्यांचे हातवारे आणि त्यांचा प्रत्येक शब्द हा त्यांच्यावर गेल्या कित्येक वर्षांपासून होत असलेल्या अन्यायाला सडेतोड उत्तर आहे...त्यांचा अभिनय ही खरी 'क्रांती' आहे!

मुंबईकरांना कामाठीपुरा माहीत नाही असं होणं शक्यच नाही. कदाचित तिथे काय घडतं, याचीही बहुतांश मुंबईकरांना कल्पना असावी. पण तिथल्या प्रत्येक वेश्येच्या आयुष्याबद्दल, जगण्याच्या संघर्षाबद्दल आणि तिच्यावर होणाऱ्या अमानवी अन्यायाबद्दल खचितच कुणाला माहीत असावं. तसं ते माहीत असण्याची शक्यताही नाही. कारण वेश्यांना समाजात असलेलं खालच्या दर्जाचं स्थान लक्षात घेता त्यांच्या समस्यांबद्दल, त्यांच्यावरच्या अन्यायाबद्दल जाणून घ्यायची तसदी घेण्याची कुणाची इच्छा होणंही कठीण आहे. आणि हीच गोष्ट 'क्रांती'ला कारणीभूत ठरली!



कामाठीपुऱ्यातल्या सेक्स वर्कर्सच्या मुलींनी या अन्यायाला वाचा फोडण्याचा निश्चय केला, आणि त्यांना साथ मिळाली ती 'क्रांती' या संस्थेची. या संस्थेसोबत काम करुन या मुलींनी 'लालबत्ती एक्स्प्रेस' नावाचं एक नाटकच उभं केलं. त्यांच्या ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी त्यांनी स्वत:चं व्यासपीठ तयार केलं. आणि मुंबई, महाराष्ट्र आणि भारतातच काय, तर थेट साता समुद्रापार इंग्लंडमध्ये त्यांनी या 'क्रांती'चा नारा दिला. म्हणायला हे फार सोपं असलं, तरी ज्या परिस्थितीचा सामना करुन या मुलींनी हे करून दाखवलं, ते अविश्वसनीय आहे!


सोळा वर्षांची राणी...कधीही बघितलं, तर तिच्या चेहऱ्यावर एक गोड हास्य पहायला मिळतं. पण तिचे डोळे मात्र खूप काही बोलून जातात. राणीचा जन्म कामाठीपुऱ्यातला. घरात हलाखीची परिस्थिती. त्यामुळे राणीची आई वैश्यव्यवसायाकडे वळली. वळली की बळजबरीने वळवली गेली, तिलाच ठाऊक! अकरा वर्षांची असताना राणीचे वडील वारले. काही दिवसांमध्ये तिच्या आईनं दुसरं लग्न केलं. पण तिचे वडील त्या दोघींना मारहाण करु लागले. अखेर याला कंटाळून राणी 'क्रांती'ने चालवलेल्या हॉस्टेल कम शेल्टरमध्ये राहायला आली. 


मी चार वर्षांपूर्वी क्रांतीमध्ये आले. क्रांतीमध्ये आल्यापासून माझा आत्मविश्वास वाढला. 'लालबत्ती एक्स्प्रेस'ने आम्ही थिएटरशी जोडले गेलो. थिएटरमुळे भूतकाळात घडलेल्या काही गोष्टी विसरण्यास मदत झाली. आज इथे खूप आनंदी आहे. स्वतंत्र आहे. क्रांतीमुळे नवीन गोष्टी शिकायला मिळतात.  

राणी, कलाकार, लालबत्ती एक्स्प्रेस


फक्त राणीच नाही, तर कामाठीपुऱ्यात राहाणाऱ्या बहुतांश मुली हळूहळू 'क्रांती' संस्थेत आश्रयासाठी आल्या...




'क्रांती' ही समाजसेवी संस्था कामाठीपुऱ्यातल्या वेश्यांच्या मुलींचे जीवन मार्गी लावण्याचे काम करत आहे. याच संस्थेच्या मदतीने कामाठीपुऱ्यातल्या १५ मुलींनी सातासमुद्रापार जाऊन त्यांचा संघर्ष जगासमोर मांडला. या मुलींनी त्यासाठी एक थिएटर ग्रुप तयार केला. लंडनच्या 'एडिंबरा' महोत्सवात या मुलींना नाटर सादर करण्यासाठी निमंत्रण मिळाले. या मुलींनी ही संधी साधली आणि त्यांची 'लालबत्ती एक्स्प्रेसथेट पोहोचली इंग्लंडला! इग्लंडमधले कम्युनिटी सेंटर्स, प्रेक्षागृह आणि एवढंच काय, तर तिथल्या रस्त्यांवर देखील या कलाकार मुलींनी नाटकाचे प्रयोग केले. अवघ्या १५ ते २२ वयोगटातल्या या मुलींचा हेतू फक्त एकच...त्यांच्या व्यथा जगासमोर मांडायच्या!



या मुलींच्या आयुष्यातला अंधार आम्हाला जगासमोर मांडायचा आहे. जगाचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलावा असाच आमचा प्रयत्न आहे. यासाठी 'क्रांती' प्रयत्नशील आहे आणि यापुढेही कायम राहील.

बानी दास, सहसंस्थापक, क्रांती


'क्रांती'ची मुलींसाठी थिएटर थेरेपी...


  • थिएटर थेरेपीमुळे मुलींना त्यांच्यावर झालेल्या अत्याचारातून बाहेर पडण्यासाठी शक्ती मिळते
  • थेरेपीद्वारे मुलींची बॉडी इमेज आणि सेल्फ इमेज सुधारण्यात मदत झाली
  • थिएटरमुळे त्यांना त्यांच्या भावना मांडता आल्या
  • सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या मुलींचा आत्मविश्वास वाढतो


लहानपणापासूनच आम्ही एका वेगळ्या वातावरणात वाढलो. त्याचा खोल परिणाम आमच्या मनावर झाला. पण यातून बाहेर पडण्यासाठी थिएटर थेरेपी फायदेशीर ठरत आहे. ही कला सादर करून आम्हाला आमचा हरवलेला आत्मविश्वास परत मिळाला आहे. आमची कहाणी लोकांपर्यंत पोहचत आहे हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे.

अस्मिता कट्टी, कलाकार, लालबत्ती एक्स्प्रेस ग्रुप




तुम्हा-आम्हाला जसा हसण्याचा, बोलण्याचा, आपलं भविष्य घडवण्याचा अधिकार आहे, तसाच तो या मुलींना आणि त्यांच्या पालकांनाही आहे. त्यांच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन त्यांना माणूस म्हणून जगण्यासाठी अटकाव करतो. आणि 'लालबत्ती एक्स्प्रेस'च्या माध्यमातून त्यांचं हेच म्हणणं आहे. कदाचित त्यांच्या या हास्यामागचं कारण आणि उंच भरारी घेण्याची प्रबळ महत्त्वाकांक्षा या 'लालबत्ती'नंतर जगाला समजू शकेल!




डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा