वडाळ्यात इंधन चोरी रॅकेटचा पर्दाफाश

अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाच्या दक्षता (विजिलन्स) पथकाने वडाळा परिसरात कारवाई करत पेट्रोल, डिझेल आणि विमान इंधन (ATF) चोरी करणाऱ्या रॅकेटचा भांडाफोड केला. या कारवाईत सुमारे 1 कोटी 31 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

रेशनिंग वितरण नियंत्रक चंद्रकांत डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली 16 जून 2026 रोजी विजिलन्स पथकाने वडाळा परिसरात छापा टाकला. कारवाईदरम्यान दोन इंधन टँकरची सील तोडून प्लास्टिकच्या कॅनमध्ये इंधन काढून चोरी केली जात असल्याचे उघड झाले.

पथकाने घटनास्थळी एका व्यक्तीला रंगेहात पकडले. तपासात प्लास्टिक पाईप आणि व्हॉल्व्हच्या साहाय्याने 20 लिटर क्षमतेच्या प्लास्टिक कॅनमध्ये इंधन काढले जात असल्याचे समोर आले.

तपासणीदरम्यान MH-04 KU-1826 या टँकरमध्ये 10 हजार लिटर पेट्रोल आणि 14 हजार लिटर डिझेल, तर MH-04 LY-6388 या टँकरमध्ये 29 हजार लिटर विमान इंधन (ATF) आढळून आले.

या कारवाईत पेट्रोल, डिझेल आणि ATFसह संबंधित टँकर व इतर साहित्य असा एकूण 1.31 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई वितरण उपनियंत्रक गणेश बेल्लाले, माधुरी शिंदे, मुख्य निरीक्षण अधिकारी नागनाथ हुंगरगे, वितरण अधिकारी गणेश पवार, सहायक वितरण अधिकारी योगेश्वर मोरे तसेच वितरण निरीक्षक रामराजे भोसले, चंद्रकांत कांबळे, विकास नागदिवे, राहुल इंगळे आणि अरुण काटे यांच्या पथकाने केली.

अन्न व नागरी पुरवठा विभागाने सांगितले की, प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून संबंधितांविरुद्ध आवश्यक कायदेशीर कारवाई केली जात आहे.


हेही वाचा

उरण: जसई गावात तलावात बुडून तीन अल्पवयीन मुलींचा मृत्यू

पुढील बातमी
इतर बातम्या