कमला लॅंडमार्कविरोधात नवीन गुन्हा, गुन्ह्यांची संख्या २२ वर

  • मुंबई लाइव्ह टीम & सूरज सावंत
  • क्राइम

ग्राहकांना घर व व्यावसायिक गाळे विकण्याच्या नावाखाली कोट्यावधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या कमला शांती लॅंडमार्क प्रॉपर्टी. प्रा. लि. च्या ४ संचालकांविरोधात आर्थिक गुन्हे शाखेने २२ वा गुन्हा नोंदवला आहे. आतापर्यंत २५० गुंतवणूकदारांची ३०० कोटीं रुपयांना फसवणूक केल्याचं तपासात पुढं आलं आहे. या सर्व गुन्ह्यातील सर्व आरोपींना या पूर्वीच पोलिसांनी अटक केली असून ते न्यायालयीन कोठडीत आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचं विशेष पथक तपास करत आहे.

बनावट कागदपत्रे

सुदक्षिणा प्रा. ट्रेडिंग लि. चे संचालक किशोर लहरानी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार २००७ मध्ये त्यांनी अंधेरीतील कमला कॉर्पोरेट पार्कमध्ये २.३९ कोटींना व्यावसायिक गाळा खरेदी केला होता. त्याबाबत त्यांना अॅग्रीमेंट पेपर देण्यात आले होते. तसंच ४ मार्च, २०१३ ला त्यांना तात्पुरता ताबाही देण्यात आला होता. पण हाच गाळा बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने सुबोध शहा नावाच्या व्यक्तीला विकण्यात आल्याचं लहरानी यांना १६ मे, २०१६ ला समजलं.

अनेकांची फसवणूक

त्यानंतर आता कमला शांती लॅंडमार्क प्रॉ. प्रा. लि. संचालक जितेंद्र जैन, जिनेद्र जैन, केतन शाह व रमेश जैन यांनी अनेकांना अशाच पद्धतीने फसवल्याचं समजल्यानंतर त्यांनी याबाबतची तक्रार आर्थिक गुन्हे शाखेककडे केली. त्यानुसार पोलिसांनी भादंवि कलम ४०९, ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, १२०(ब) व मोफाच्या कलम ३, ४, ५, १३, १४(१) (२) अंतर्गत गुन्हा दाखल केला.

२५० गुंतवणूकदारांच्या तक्रारी

नुकताच दाखल करण्यात आलेला हा गुन्हा त्यांच्याविरोधातील २२ वा गुन्हा असून त्यांच्याविरोधात सुमारे २५० लोकांनी तक्रारी केल्या आहेत. त्यात सुमारे ३०० कोटींची फसवणूक झाल्याचा आरोप आहे. त्यामुळे या प्रकरणांच्या तपासासाठी विशेष तपास पथक निर्माण करण्यात आले असून ते या प्रकरणांचा तपास करत असल्याचं एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं.


हेही वाचा-

वेगाची नशा नडली, बाइकस्वार पोहोचला रुग्णालयात

एसआरए घोटाळ्यातील ३३ फ्लॅट जप्त, बाबा सिद्दीकीचा सहभाग उघड


पुढील बातमी
इतर बातम्या