देवेन भारतींची बदली, साडेचार वर्षांपासून होते एकाच पदावर

मुंबई पोलिस दलातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न मागील ५ वर्षांपासून व्यवस्थितरित्या हाताळणारे सह पोलिस आयुक्त देवेन भारती यांची रविवारी बदली करण्यात आली. भारती यांच्याकडे आर्थिक गुन्हे शाखेच्या सहआयुक्तपदाची जबाबदारी सोपवण्यात आली असून भारती यांच्या जागी विनयकुमार चौबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने रविवारी भारती यांच्या बदलीचे आदेश दिले.

मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतील

मागील ५ वर्षांपासून मुंबईतील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उत्कृष्टपणे हाताळल्यामुळे भारती यांची वर्णी मुख्यमंत्र्यांच्या खास अधिकाऱ्यांच्या यादीत लागली होती. त्यामुळेच भारती यांचा कार्यकाळ संपलेला असतानाही त्यांच्या कर्तव्यतत्परतेमुळे गृहखात्याने त्यांना कार्यकाळ वाढवून दिला होता.

एकाच पदावर

भारती यांच्या कालावधीत ५ पोलीस आयुक्तांच्या बदल्या झाल्या. त्यापैकी ३ पोलीस आयुक्त निवृत्तही झाले. लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर गृहविभागाने राज्य पोलीस दलातील अधिकार्‍यांच्या अंतर्गत बदल्या केल्या होत्या. त्यात काही आयपीएस अधिकार्‍यांसह इतर पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या झाल्या होत्या. मात्र एकाच पदावर चार-साडेचार वर्षे राहूनही देवेन भारती यांची बदली झाली नव्हती.

बदलीचे आदेश

त्यातच गृहखात्याने लोकसभा निवडणुकीत भारती यांना मुदतवाढ मिळावी, अशी मागणी केली असता निवडणूक आयोगाने त्यांना मुदतवाढ देण्यास नकार दिला. अखेर गृहविभागाला त्यांच्या बदलीचे आदेश काढावे लागले, असं म्हटलं जात आहे.

एकमेव अधिकारी

देवेन भारती यांनी त्याच्या कार्यकाळात ५ पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट काम केलं. त्यात राकेश मारिया, जावेद अहमद, दत्ता पडसळगीकर, सुबोध जैस्वाल आणि आता संजय बर्वे यांचा समावेश आहे. यातील ३ पोलीस आयुक्त निवृत्त झाले, तर सुबोध जैस्वाल हे राज्य पोलीस महासंचालक म्हणून कार्यरत आहेत. या ५ पोलीस आयुक्तांसोबत काम करणारे देवेन भारती हे मुंबई पोलीस दलातील एकमेव सहपोलीस आयुक्त आहेत.


हेही वाचा-

Exclusive - सी लिंकची सुरक्षा वाढवणार

Exclusive- मुंबई पोलिस दलात दाखल होणार ६ नव्या 'ट्राॅलर' बोटी


पुढील बातमी
इतर बातम्या