नायर रूग्णालय मृत्यू प्रकरण - उपायुक्त सुनील धामणे करणार चौकशी

  • मुंबई लाइव्ह टीम & सचिन धानजी
  • क्राइम

नायर रुग्णालयात रुग्णासोबत गेलेल्या नातेवाईकाचा एमआरआय मशिनने चुंबकीय शक्तीने खेचला गेल्यामुळे एका तरुणाचा मृत्यू झाला होता. या दुघर्टनेची चौकशी करण्यासाठी उपायुक्त (आरोग्य) सुनील धामणे यांची समिती गठित करण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी करून पुढील १५ दिवसांमध्ये अहवाल देण्याचे आदेश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिले आहेत.

एमआरआय रूममध्ये गुदमरून मृत्यू

रुग्णासोबत ऑक्सिजन सिलेंडरचा बाटला घेऊन एमआरआय सेंटरमध्ये गेलेल्या मारु या तरुणाला मशिनने चुंबकीय शक्तीने खेचून घेतले. यामध्ये गॅस लिकेज होऊन त्यात गुदमरून तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेला जबाबदार असलेल्या डॉक्टरसह दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी उपायुक्त सुनील धामणे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठित केली आहे.

'वरीष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करा'

दरम्यान, भाजपाचे आमदार मंगलप्रभात लोढा यांनी मारु यांच्या नातेवाईकांसोबत अतिरिक्त आयुक्त आय. ए. कुंदन यांची भेट घेतली. यामध्ये त्यांनी या प्रकरणाची चौकशी उपायुक्तांऐवजी वरिष्ठ पदावरील अधिकाऱ्यामार्फत व्हावी, अशी मागणी केली आहे. उपायुक्त पदावरील अधिकारी या प्रकरणी न्याय देऊ शकणार नाहीत, अशीही शंका लोढा यांनी व्यक्त केली.

'पालिकेकडूनही ५ लाखांची मदत द्या'

मृत तरुणाच्या नातेवाईकाला अर्थात त्याच्या बहिणीला महापालिका सेवेत घ्यावे, अशी मागणी मृत तरुणाचे काका नारायण जेठिया यांनी केली आहे. राज्य सरकारने मृताच्या नातेवाईकाला पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केल्यानंतर विरोधी पक्षनेते रवी राजा यांनीही महापालिकेकडून मृताच्या नातेवाईकाला पाच लाख रुपये देण्याची मागणी केली आहे.

महापालिका कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे या तरुणाचा नाहक बळी गेला आहे. एमआरआय सेंटरमध्ये काम करणाऱ्या कामगार, कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारचे सुरक्षिततेचे प्रशिक्षण दिले गेले नसून, त्या सर्वांना याचे ज्ञान दिले जावे.

रवी राजा, विरोधी पक्षनेते

टेक्निकल ऑडिटची मागणी

रवी राजा यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव यांनी रविवारी संध्याकाळी नायर रुग्णालयाला भेट दिली होती. या घटनेनंतर राखी जाधव यांनी महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांसह सर्व उपनगरीय रुग्णालयांमध्ये एमआरआय, तसेच सिटी स्कॅन सेंटर बनवले आहेत. या सर्वांचे तांत्रिक परिक्षण (टेक्निकल ऑडिट) करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली.


हेही वाचा

पेशंटसोबत गेला आणि एमआरआय मशिनमध्ये अडकला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

पुढील बातमी
इतर बातम्या