पेशंटसोबत गेला आणि एमआरआय मशिनमध्ये अडकला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

आपल्या बहिणीच्या सासूला बघण्यासाठी मुंबईच्या नायर हॉस्पिटलमध्ये गेलेला राजेश एमआरआय मशिनमध्ये अडकून मृत्यू पावला. रुग्णालय प्रशासन आणि कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे राजेश एमआरआय रूममध्ये ऑक्सिजन सिलेंडर घेऊन गेला. आणि तिथेच त्याचा घात झाला.

पेशंटसोबत गेला आणि एमआरआय मशिनमध्ये अडकला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
SHARES

एमआरआय मशीन आणि रुग्णालयात वेळीच उपलब्ध नसलेला कर्मचारी वर्ग यामुळे मुंबई सेंट्रलच्या नायर रुग्णालयात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या तरुणाचं नाव राजेश असं आहे. याप्रकरणी नायरचे डॉ. सिद्धांत शाह आणि वॉर्डबॉय विठ्ठल या दोघांना पोलिसांनी अटक केली असून महिला वॉर्ड अटेंडंट सुनीता सुर्वेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे ओढावला मृत्यू

३२ वर्षीय राजेश आपल्या बहिणीची सासू लक्ष्मी यांना बघायला नायर रुग्णालयात गेला होता. यावेळी डॉक्टरांनी लक्ष्मी यांचा एमआरआय टेस्ट करण्यास सांगितले. त्याप्रमाणे राजेश यांचे भाऊजी हरीश सोळंकी त्यांच्या आई लक्ष्मी यांना एमआरआयसाठी घेऊन गेले. तेव्हा राजेशही त्यांच्यासोबत गेले. तेव्हा लक्ष्मी यांना ऑक्सिजन सिलेंडर लावण्यात आला होता. तो सिलेंडर तसाच लक्ष्मी यांच्यासोबत एमआरआय विभागात नेण्यात आला.

रुग्णालयातील वॉर्डबॉयने सांगितलं की 'एमआरआय मशीन सध्या बंद आहे, तुम्ही ऑक्सिजन सिलेंडर आत घेऊन जाऊ शकता'. राजेशच्या हातात ऑक्सिजन सिलेंडर होता. यावेळी वॉर्ड बॉयने राजेशला रुग्णासोबत थांबायला सांगितलं. लक्ष्मी यांचे नातेवाईक वॉर्डमध्ये असताना राजेश यांना एमआरआय मशीनच्या मॅग्नेटिक पॉवरने खेचून घेतलं, असं रुग्णालय प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे. या घटनेत राजेश यांचा हात मशिनमध्ये अडकला.

जेव्हा राजेश आत गेला तेव्हा एमआरआय मशिन सुरूच होत्या. मशिनने सिलेंडरसोबत राजेशलाही खेचून घेतलं. त्याला त्वरीत बाहेर काढण्यात आलं. पण, राजेशचा पुढच्या २ मिनिटांत मृत्यू झाला. या घटनेनंतर नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनावर प्रश्न उपस्थित केले आहेत.

एमआरआय रूममध्ये कोणतीही धातूची वस्तू घेऊन जाता येत नाही. मग राजेशला असा ऑक्सिजन सिलेंडर आतमध्ये घेऊन जाण्यास का सांगण्यात आलं? हा सर्व डॉक्टर आणि वॉर्डबॉय यांचा हलगर्जीपणा आहे.

हरीश सोळंकी, राजेशचे भावोजी


तिघांविरोधात गुन्हा दाखल

दरम्यान, याप्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉक्टर सिद्धांत शाह, वॉर्डबॉय विठ्ठल आणि महिला वॉर्ड अटेंडंट सुनीता सुर्वे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी सिद्धांत शाह आणि वॉर्डबॉय विठ्ठल यांना अटक करण्यात आली आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा