परमबीर सिंह यांच्याविरोधात तिसरं अजामीनपात्र वॉरंट जारी

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अडचणी आणखीन वाढल्या आहेत. परमबीर सिंह यांच्याविरोधात तिसरे अजामीपात्र वॉरंट न्यायालयानं जारी केलं आहे. परमबीर सिंह यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या २० कोटी रुपयांच्या खंडणीप्रकरणी हे वॉरंट जारी करण्यात आलंय.

काही दिवसांपूर्वीच परमबीर सिंह यांच्याविरोधात दुसरं अटक वॉरंट ठाण्यातील न्यायालयानं जारी केलं होतं. आता मुंबईमध्ये आणखीन एक अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलंय. त्यामुळे आधीच बेपत्ता असलेल्या परमबीर सिंह यांच्याविरोधात खंडणी प्रकरणामधील एकूण वॉरंटची संख्या तीनवर पोहचली आहे.

बेंच अ‍ॅण्ड बारनं दिलेल्या वृत्तानुसार परमबीर सिंह यांच्याविरोधात मुंबईमधील न्यायालयानं अजामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे. मरीन ड्राइव्ह पोलीस स्थानकामध्ये दाखल करण्यात आलेल्या खंडणीच्या प्रकरणामध्ये हे वॉरंट जारी करण्यात आलं आहे.

यापूर्वी परमबीर सिंह यांच्याविरोधात खंडणी प्रकरणामध्येच गोरेगाव आणि ठाण्यामध्ये अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं होतं.

मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात श्यामसुंदर अग्रवाल यांच्या तक्रारीवरून खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी परमबीर सिंह हे मुंबई पोलिस आयुक्त झाल्यानंतर त्यांनी पदाचा दुरूपयोग केल्याचा आरोप आहे.

कुख्यात गुंड छोटा शकील मार्फत पुनामियाला धमकी दिल्याच्या आरोपाखाली भाईंदर येथील बांधकाम व्यावसायिक श्यामसुंदर अग्रवाल यांना मोक्काअंतर्गत गुन्हा नोंदवून अटक करण्याची धमकी सिंह यांनी दिली.

तसंच पुतण्याची खोटी स्वाक्षरी घेऊन खोटे दस्तावेज तयार करून अग्रवाल यांची कोटय़ावधी रुपयांची मालमत्ता खंडणी म्हणून घेतली. याच प्रकरणात पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे, आशा कोरके यांनी ५० लाखांची खंडणी मागितली होती. अग्रवाल यांनी ती दिल्याचा आरोप आहे.

गोरेगावमधील बिमल अग्रवाल या बिल्डरनं ९ लाख रुपयांच्या खंडणीचा आरोप करत गुन्हा दाखल केला होता. तसंच सचिन वाझेला आत्तापर्यंत एकूण ११ लाख ९२ हजारांचा हप्ता दिल्याचंही त्यांनी तक्रारीत म्हटलं होतं.

परमबीर सिंह यांच्यासह सचिन वाझे, सुमित सिंह ऊर्फ चिंटू, अल्पेश पटेल, विनय सिंह ऊर्फ बबलू आणि रियाज भाटी यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले आहे.


हेही वाचा

पुनम पांडे रुग्णालयात दाखल, पती खातोय तुरुंगाची हवा

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक

पुढील बातमी
इतर बातम्या