स्पायडरमॅन टोळी अडकली जाळ्यात!

टोलेजंग इमारतीत चोऱ्या करणारी स्पायडरमॅन टोळी जुहू पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे. दोन चिमुरड्यांसह एकूण सहा जणांना जुहू पोलिसांनी यावेळी अटक केली असून लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे. रात्रीच्या वेळी टोलेजंग इमारतीत चोऱ्या करण्यात ही टोळी माहीर असून ११ व्या मजल्यावर देखील पाईपच्या सहयाने चढून या टोळीने घरं साफ केलेली आहेत.

काही दिवसांपूर्वी जुहू पोलिसांना खबर मिळाली की चोऱ्या करणारी टोळी मिठीबाई कॉलेजजवळ येणार आहे. जुहू पोलिसांनी सापळा लावला आणि रमेश देवेंद्र(२१), काशिनाथ विश्वकर्मा(२२), कृष्णा देवेंद्र(२०) आणि प्रेमकुमार देवेंद्र(२२) या चौघांना अटक केली आहे. या चौघांसह दोन अल्पवयीन मुलं देखील या टोळीचे सदस्य असून या सहा जणांकडून २० मोबाईल फोन, १ आयपॅड तसेच १ लाख २८ हजारांचे दागिने असा एकूण २ लाख ८६ लाखांचा ऐवज जुहू पोलिसांनी जप्त केला आहे.

चोऱ्या करण्यासाठी चिमुरड्यांचा वापर

जुहू सारख्या उच्भ्रू परिसरात अनेक टोलेजंग इमारती आहेत. ही टोळी त्याच इमारतींना आपलं लक्ष करायची. रात्रीच्या वेळी १६ - १७ वर्षांच्या लहान मुलांना पाईपच्या साहायाने इमारतींवर चढवलं जायचं. पाईप चढण्यात पटाईत असलेली ही मुलं पाईप चढून वर जायची आणि कधी उघड्या खिडक्यांमध्ये हात घालून तर कधी ग्रील वाकवून घरात घुसून घर साफ करायची. एका इमारतीच्या ११ व्या मजल्यावर पाईपने चढून या टोळीने चोरी केल्याची माहिती जुहू पोलिसांनी दिली आहे.

आत्तापर्यंत या टोळीकडून जुहू परिसरातील सात घरफोड्या आणि तीन चोऱ्या, त्याच बरोबर खार आणि अंधेरी जीआरपीची एक केस सोडवल्याची माहिती तपास अधिकारी राहुल देशमुख यांनी दिली आहे.


हेही वाचा

या 'कोडवर्ड'ने संवाद साधते डी कंपनी

पुढील बातमी
इतर बातम्या