चालकाला झोप लागल्याने ओला थेट समुद्रात

भरधाव कार चालवताना चालकाला झोप लागली आणि कार थेट समुद्रात जाऊन पडल्याचा विचित्र प्रकार गुरुवारी पहाटे हाजी अली समोर घडला. सुदैवाने या अपघातात कोणी जखमी झालं नसलं, तरी कारचं मात्र प्रचंड नुकसान झालं आहे. या प्रकरणी ताडदेव पोलिसांनी चालक अब्दुल रशीद शेख(३५) विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

नायगावला राहणाऱ्या आदित्य तावडे (२३) नावाच्या मुलाने आपल्या परराज्यातून आलेल्या मित्रांना मुंबई दाखवण्याचा प्लॅन केला. गुरुवारी रात्री आदित्य तावडे (२३) आणि त्याचे मित्र प्रितेश कंदई(२०) आणि आकाश विश्वकर्मा (१९) यांनी मुंबई दर्शनासाठी ओला बुक केली. रात्री २ वाजता माहीम वरून हे तिघे निघाले. गेट वे ऑफ इंडिया, नरिमन पॉईंट, हाजी अली आणि वाटेत लागणारी देवीच्या मंडपाची आरास बघत हे तिघे माहीमचा दर्गा पहाण्यासाठी पुन्हा माहीमच्या दिशेने निघाले.

कसा झाला अपघात?

पहाटे साडे चारच्या सुमारास गाडी हाजी अली समोरील लाला लजपतराय मार्गावरून जात असताना चालक अब्दुल रशीद शेखचा डोळा लागला आणि गाडी थेट समुद्रात असलेल्या टेट्रा पॉडवर जाऊन आदळली. अपघाताच्या वेळी लाल रंगाची वॅगनआर एम एच 01 सीजे 4265 क्रमांकाची गाडी एवढ्या वेगात होती की तिने आधी लोखंडी कुंपण तोडले. तिथून ती थेट कठडा ओलांडून समुद्रातील टेट्रा पॉड वर जाऊन आदळली. ही दुर्घटना एवढी भीषण होती, कि त्यात गाडीचं मोठं नुकसान झालं. सुदैवाने गाडीतील तिघांना केवळ किरकोळ जखमा झाल्या.

"या प्रकरणी आरोपी चालकाविरुद्ध भादंवि २७९, ३३७, आणि ४२७ कलमांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून, त्याला कोर्टात हजार करण्यात आल्यानंतर जामीन मंजूर केला," अशी माहिती ताडदेव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सुर्वे यांनी 'मुंबई लाईव्ह'शी बोलताना दिली.


हेही वाचा

पत्नींची अदलाबदल करण्यावरुन व्यापाऱ्याची हत्या

पुढील बातमी
इतर बातम्या