पेट्रोल पंपावर मोबाईल वापरासाठी हटकले म्हणून मारहाण!

'पेट्रोल पंपावर मोबाईल फोनवर बोलू नये' हा नियम बहुधा आपल्यापैकी सर्वांनाच माहिती असावा. काहींना तो माहीत नसेल, तर पेट्रोलपंप चालकांकडून संबंधित व्यक्तींना तो सांगितला जातो, आणि तसं न करण्याबाबत बजावलं जातं. तसं न केल्यास, पेट्रोलपंपावर स्फोट होऊन जिवीत आणि वित्तहानी होऊ शकते.

पेट्रोलपंप चालकाला मारहाण

पण चेंबुरमधल्या काही माजलेल्या बाईकस्वारांना याची माहिती नसावी. त्यामुळेच आपल्याच भल्यासाठी आपल्याला मोबाईल न वापरण्याबाबत सांगणाऱ्या पेट्रोलपंपचालकाला मारहाण करण्याची त्यांची हिंमत झाली. पोलिसांनीही प्रकरण अधिक न वाढवता फक्त दंड आकारून प्रकरण हातावेगळं केलं.

काय आहे प्रकरण?

काही दिवसांपूर्वी चेंबुरमधल्या एचपी पेट्रोलपंपावर कुर्ला कसाईवाडा परिसरात राहणारा एक दुचाकीस्वार पेट्रोल भरण्यासाठी आला. मात्र, नियमाविरूद्ध जात त्याने पेट्रोलपंपावरच मोबाईल काढून बोलायला सुरुवात केली. हा प्रकार पाहून तिथेच उभे असलेले पेट्रोलपंप कर्मचारी विक्रांत सिंह यांनी त्याला हटकले आणि तसे न करण्याचा सल्ला दिला.

आपल्याच भल्यासाठी दिलेला सल्ला सदर तरूणाला आवडला नाही. त्याने विक्रांत सिंह यांच्याशी हुज्जत घालायला सुरुवात केली. पण प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही. या तरूणाच्या काही मित्रांनी मागून येऊन विक्रांत सिंह यांना थेट मारहाण करायला सुरुवात केली.

पोलिसांकडून कारवाई

अखेर हे सर्व प्रकरण हाताबाहेर गेल्यानंतर आणि सदर तरूण मारहाण करतच राहिल्याचे पाहून पोलिसांना बोलावण्यात आले. मात्र, पोलिस येईपर्यंत मारहाण करणाऱ्या सर्व तरूणांनी तिथून पळ काढला होता. दरम्यान, या प्रकरणी संबंधित तरूणांवर कारवाई करण्यात आल्याचे चुनाभट्टी पोलिसांनी सांगितले.

यांना अक्कल येणार कधी?

पेट्रोलपंपावर मोबाईलचा वापर आग लागण्यासाठी निमंत्रण ठरू शकतो. प्रसंगी अशा दुर्घटनांमध्ये अनेकांचे जीवही जाऊ शकतात. मात्र हे टाळण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या विक्रांत सिंह यांना मात्र या माजलेल्या तरूणांच्या दादागिरीचा सामना करावा लागला. त्यामुळे, पेट्रोल पंप हे त्यांची खाजगी मालमत्ता नाही, हे अशा लोकांना सांगण्याचीच आता गरज निर्माण झाली आहे.


हेही वाचा

नीट बघा...पेट्रोलपंपावर तुम्ही लुटले जाताय!

पुढील बातमी
इतर बातम्या