नीट बघा...पेट्रोलपंपावर तुम्ही लुटले जाताय!

  Mumbai
  नीट बघा...पेट्रोलपंपावर तुम्ही लुटले जाताय!
  मुंबई  -  

  हल्ली प्रत्येकाकडे गाडी असतेच. आणि गाडी असली, की त्यात पेट्रोल भरावं लागतंच. महिन्याला आपण किमान हजार ते दीड हजार रुपयांचं पेट्रोल भरतो. पण तुम्ही पेट्रोलपंपावर पूर्ण पेट्रोल भरतच नाहीत! धक्का बसला ना? तुम्ही भरत असलेल्या पेट्रोलपैकी 4 टक्के पेट्रोल ही काही पेट्रोलपंपांवर बसवलेल्या एका विशिष्ट चीपमुळे भरलंच जात नाही. पण पैसे मात्र आपल्याकडून पूर्ण घेतले जातात. ग्राहकांना लुबाडण्यासाठी असे काही पेट्रोलपंपचालक या चीपचा वापर करताना आढळून आले आहेत.

  पेट्रोल चोरीच्या तारा महाराष्ट्रात किती खोलवर रुतल्या आहेत, हे ठाणे पोलिसांनी राज्यभर केलेल्या कारवाईतून पुढे येत आहे. ठाणे पोलिसांनी राज्यभरातील 98 पेट्रोल पंपांवर आतापर्यंत कारवाई केली असून 22 जणांना अटक केली आहे.

  यामध्ये पेट्रोलपंपावर पेट्रोल चोरी करण्यामध्ये सहभागी असलेल्या मास्टरमाइंडसह 2 पेट्रोल पंप मालक आणि 6 मॅनेजरचा समावेश असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेचे डीसीपी अभिषेक त्रिमुखे यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना दिली.

  काही दिवसांपूर्वीच विवेक शेट्टे या मास्टरमाइंडला ठाणे गुन्हे शाखेने अटक केली होती. पेट्रोल पंपाला बसवण्यात येणाऱ्या सगळ्या चीपचे सॉफ्टवेअर आणि आयसी विवेक आणि त्याच्या साथीदारानेच मिळून बनवल्याचे पोलिसांनी सांगितले. एवढेच नव्हे, तर त्याने आपल्या कंपनीची नोंदणी मुंबई शेअर बाजारात देखील केली होती.


  तीन हजारांच्या चीपने कोट्यवधींचा नफा!

  तीन हजार रुपयांची एक 'पल्सर चीप' पेट्रोल पंप मालकांना वर्षाला कोट्यवधी रुपयांचे काळे धन मिळवून द्यायची. महाराष्ट्रासह देशभरात राबवलेल्या धाडसत्रानंतर हे सत्य समोर आले आहे. ही चीप पेट्रोल पंपाला लावल्यानंतर ग्राहकाला सरासरी 4 टक्के कमी इंधन मिळायचे. परंतु, ग्राहकाकडून पूर्ण पैसे वसूल केले जायचे. एखादा ग्राहक महिन्याभरात 100 लिटर पेट्रोल भरत असल्यास त्याला या 'पल्सर चीप'मुळे वर्षाला साडेआठ हजार रुपयांचा फटका बसायचा.


  कशी चालायची हेराफेरी?

  पेट्रोल पंप मशीनच्या केवळ दोन ठिकाणच्या वायर्स बदलून ही चीप त्यात बसवली जायची. पंपचालक आपल्या सवडीने पेट्रोल पंपावरील ठराविक नोझलवर ही चीप बसवायचे. चीपमधील प्रोग्रामनुसार प्रत्येक वेळी पेट्रोल भरताना चीपद्वारे ग्राहकाला 4 टक्के कमी इंधन मिळायचे. पण काटा पूर्ण पेट्रोल भरल्याचे दाखवायचा. तपास यंत्रणांना गुंगारा देण्यासाठी रिमोट कंट्रोलची व्यवस्था देखील त्यात करण्यात आली होती. एक बटण दाबताच इंधनाचा पुरवठा सुरळीत करणे शक्य असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.

  सुरुवातीला अशी प्रकरणे उत्तर प्रदेशात समोर आली होती. त्यानंतर महाराष्ट्रासह पंजाबमध्ये देखील कित्येक पेट्रोलपंप चालक या चीपच्या मदतीने कोट्यावधी रुपये कमावत असल्याचे समोर आले.


  असा व्हायचा फायदा

  • पेट्रोलचा दर 75 रुपये आहे असे समजूया
  • प्रत्येक पेट्रोल पंपावर रोज किमान 10 हजार लिटर पेट्रोलची विक्री
  • प्रत्येक फिलिंगमधून 4 टक्के पेट्रोलची चोरी
  • त्यातून दिवसाला 30 हजार रुपयांपेक्षा जास्त कमाई
  • वर्षाला आकडा 1 कोटी 10 लाखांच्या घरात  हे देखील वाचा -

  सावधान ! तुमचेही व्हॉट्सअॅप होऊ शकते हॅक!


  डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

  मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

  (खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

   

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.