सावधान ! तुमचेही व्हॉट्सअॅप होऊ शकते हॅक!


सावधान ! तुमचेही व्हॉट्सअॅप होऊ शकते हॅक!
SHARES

बँक अकाऊंट हॅक होणे, ईमेल हॅक होणे हे काही नवीन नाही. पण व्हॉट्सअॅप हॅक होते हे ऐकून तुम्हाला धक्का बसला असेल ना. पण हो हे खरे आहे. त्यामुळे व्हॉट्सअॅपचा वापर करताना जरा सांभाळून.

कारण काही दिवसांपूर्वी नाशिक पोलिसांनी राजस्थानच्या बडमोरमधून एका सराइत व्हॉट्सअॅप हॅकरला बेड्या ठोकल्या. दिप्तेश सालेचा नावाच्या हॅकरने नाशिकमध्ये धुमाकूळ घातला होता. एकट्या नाशिक शहरात या भामट्याने 34 जणांचे व्हॉट्सअॅप अकाऊंट हॅक केले होते. त्यामध्ये 32 महिलांचा समावेश होता. 



मुंबईतही केले व्हॉट्सअॅप हॅक

या दिप्तेशला अटक झाल्यानंतर त्याने मुंबईत देखील अनेकांना फसवल्याचे समोर आले आहे. बोरिवलीत राहणाऱ्या प्रज्ञा दोषी या जानेवारी महिन्यात फिरायला निघाल्या होत्या. मुंबई ते मनाली आणि तेथून पुढे वाघा बॉर्डर असा त्यांचा प्रवास होता. त्या मुंबई विमानतळावर असताना अचानक त्यांच्या मोबाईलवर जुन्या एका मैत्रिणीचा व्हॉट्सअॅप मेसेज आला.

जुन्या मैत्रिणीला अचानक आपली आठवण आल्याचे बघून प्रज्ञा यांना आश्चर्य वाटले. पण नंबर तिचाच आहे का याकडे मात्र त्यांनी दुर्लक्ष केले. इथले तिथले बोलून झाल्यावर या मैत्रिणीने आपल्याला पैशाची खूप गरज असल्याचे प्रज्ञाला सांगितले. ती एवढ्यावरच थांबली नाही तर, पैसे पेटीएम अकाऊंटवर पाठवण्यास सांगितले. 

पण प्रज्ञा यांचे पेटीएम अकाऊंटच नसल्याने त्यांना ते शक्य नव्हते. आता या मैत्रिणीने दूसरी शक्कल लढवली. तीने प्रज्ञाला तिच्या मोबाईलवर आलेला एक मेसेज पाठवण्यास सांगितला. तीने सांगितल्याप्रमाणे प्रज्ञाने तो मेसेज आपल्या मैत्रिणीला फॉरवर्ड केला आणि तिथेच त्या फसल्या.


मेसेज केल्यानंतर मी विमानात बसले आणि बराच वेळ माझा फोन बंदच होता. मात्र फोन सुरू झाल्यानंतर माझ्या व्हॉट्स अॅप ग्रुपवर पुन्हा एक मेसेज आला. त्यामध्ये लिहले होते 'आपल्याला पैशांची खुप गरज आहे. ते वाचून माझ्या 4 नातेवाईकांनी मिळून तात्काळ तब्बल 20 हजार रुपये पेटीएम केले देखील. पण जेव्हा मला हे समजले तोपर्यंत खूप उशीर झाला होता.
- प्रज्ञा दोषी

पण ज्या महिला या दिप्तेश सालेचा याच्या जाळ्यात अडकत नसत त्यांना तो अश्लील मेसेजेस पाठवत असल्याचे पोलिस तपासातून समोर आले आहे .


दिप्तेशची मोडस ऑपरेंडी?

या दिप्तेश सालेचाची मोडस अगदीच साधी आहे. सगळ्यात आधी तो व्हॉट्सअॅप हॅक करायचा. त्यानंतर त्याच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील सर्वांना तो मेसेज पाठवायचा आणि पैशाची मागणी करायचा. जे फसतात त्यांच्याकडून पैसे उकळायचा. जे कुणी त्याच्या जाळ्यात अडकत नसे त्यांच्याकडून तो ओटीपी मागवायचा. ओटीपी मिळताच त्यांचेही अकाऊंट हॅक करायचा आणि मग फसवण्याची मालिका पुन्हा नव्याने सुरू करायचा.
आतापर्यंत या दिप्तेशने नाशिकसह मुंबई आणि नवी मुंबईतील अनेकांना फसवल्याचे तपासातून समोर आले आहे.


व्हॉट्सअॅप हॅकिंगपासून कसे वाचाल?

  • आपला ओटीपी (one time password ) कोणाशीही शेअर करू नका
  • कोणतीही गोष्ट शेअर करण्यापूर्वी फोन करून खातरजमा करून घ्या
  • अनोळखी लिंक ओपन करू नका
  • त्याने तुमच्या फोनमधील सगळा डेटा हॅक होऊ शकतो
  • व्हॉट्स अॅपमधील टू स्टेप वेरिफिकेशन प्रणाली (एनेबल) सुरू करा



हेही वाचा - 

हॉटेलात बिलासाठी एटीएम कार्ड द्याल तर खबरदार! तुमचाही असाच घात होईल!

ज्येष्ठ नागरिकांनो, असे तुमच्यासोबतही घडू शकते


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा