अँकर अर्पिता तिवारी हत्येप्रकरणी मित्र अमित हाजराला अटक

अँकर अर्पिता तिवारी हत्या प्रकरणात मालवणी पोलिसांनी सोमवारी सकाळी तिचा मित्र अमित हाजरा याला अटक केली. कलिनाच्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेत हाजराची लाइव्ह डिटेक्टर चाचणी केल्यानंतर त्याचा या प्रकरणात सहभाग निश्चित झाल्याने अटक केल्याची माहिती मालवणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक फटांगरे यांनी दिली. न्यायालयात हजर केले असता, हाजराला २० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली अाहे.

फेसबुक चॅटद्वारे संशय बळावला

१० डिसेंबर रोजी अर्पिताने फेसबुकद्वारे हाजरासोबत चॅट केले होते. त्यातून संशय बळावल्याने हाजराला अटक करण्यात अाली. हाजरा काहीतरी लपवत असल्याचे निदर्शनास अाल्यानंतर पोलिसांनी त्याला कलिनाच्या न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेत लाइव्ह डिटेक्टर चाचणीसाठी पाठवले. त्यामध्येही हाजराचा सहभाग दिसून अाल्याने पोलिसांनी त्याला अटक केली अाहे.

काय अाहे प्रकरण?

मालवणीतील मानव कल्याण इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर ११ डिसेंबर रोजी अँकर अर्पिता तिवारीचा मृतदेह सापडला होता. अर्धनग्न अवस्थेत अर्पिता रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. याच इमारतीच्या १५व्या मजल्यावर राहणाऱ्या पंकज जाधवसोबत ती गेल्या पाच वर्षांपासून लिव्ह अँड रिलेशनशिपमध्ये रहात होती. मीरा रोड येथे राहणाऱ्या अाईवडिलांना १० डिसेंबर रोजी ती भेटली होती. त्यावेळी अापण गोराईतील एस्सेल वर्ल्ड येथील कार्यक्रमाला जात असल्याचं तिनं सांगितलं होतं. पण अर्पिता त्याच रात्री पंकजच्या घरी मित्रांसोबत पार्टी करत होती. रात्री उशिरा पार्टी संपल्यानंतर सर्व जण झोपले होते. सकाळी अर्पिता दिसून न अाल्यानं सर्वच जण तिचा शोध घेत होते. अखेर दुसऱ्या माळ्यावर रक्ताच्या थारोळ्यात तिचा मृतदेह अाढळला होता.


हेही वाचा - 

अँकर अर्पिता तिवारी हत्या प्रकरण, आरोपीविरोधात गुन्हा दाखल


पुढील बातमी
इतर बातम्या