म्हाडातील महिला अधिकाऱ्याला बेड्या; बनावट व्हेकेशन नोटिशीद्वारे घर देणं भोवलं

बनावट व्हेकेशन नोटिशीद्वारे म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या घराचं वितरण करणाऱ्या संध्या लांडगे या महिला अधिकाऱ्याच्या मुसक्या अखेर पोलिसांनी आवळल्या आहेत. बुधवारी या महिला अधिकाऱ्याला न्यायालयानं १० सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी दिल्याची माहिती खेरवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी मुंबई लाईव्हला दिली.

अधिकाऱ्यांच्या वरदहस्ताने भ्रष्टाचार

उपकरप्राप्त धोकादायक इमारतीतील रहिवाशांना दुरुस्ती मंडळाकडून संक्रमण शिबिरात स्थलांतरीत केलं जातं.  यावेळी या रहिवाशांना व्हेकेशन नोटीस दिली जाते. जेव्हा मूळ इमारतीचा पुनर्विकास होतो तेव्हा या व्हेकेशन नोटिसीद्वारे रहिवाशाला पात्र केलं जातं. त्यामुळे बनावट व्हेकेशन नोटीस तयार करत पुनर्विकासातील घरं लाटण्याचा गोरख धंदा वर्षानुवर्षे म्हाडात राजरोसपणे सुरू आहे. म्हाडा अधिकाऱ्यांच्या वरदहस्ताने हे सर्व घडत असल्याचं लांडगे यांच्या अटकेतून समोर अालं आहे.

आणखी अधिकारी अडकणार 

लांडगे म्हाडात उपसमाज अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. लांडगे यांनी बनावट व्हेकेशन नोटिशीद्वारे घराचं वितरण केल्याचं चार वर्षांपूर्वी लक्षात अालं होतं. २०१५ मध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून पोलिस या प्रकरणी तपास करत होते. अखेर लांडगे दोषी असल्याचं सिद्ध झालं आणि त्यांना पोलिसांनी बुधवारी अटक केली. पोलिस कोठडीत असलेल्या लांडगे यांनी आणखी काही अधिकाऱ्यांची नावं घेतली आहेत. त्यामुळे आणखी म्हाडा अधिकारी, कर्मचारी पोलिसांच्या जाळ्यात अडकणार आहेत.

मुसक्या अावळणार?

दलाल आणि म्हाडाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी म्हाडाला पोखरून काढलं आहे. पण म्हाडाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्यानं त्यांचं फावत आहे.  आजही म्हाडात दलालांचा सुळसुळाट आहे. आता या अटकेनंतर तरी म्हाडा दलाल आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांऱ्या मुसक्या अावळणार का हाच प्रश्न आहे.  या प्रकरणी दुरुस्ती मंडळाचे मुख्य अधिकारी दिनकर जगदाळे यांना विचारलं असता, त्यांनी पोलिसांच्या कारवाईच्या अनुषंगाने चौकशी केल्यानंतर लांडगे यांच्यावर निलंबन वा बडतर्फ करण्याची कारवाई करण्यात येईल असं सांगितलं आहे.


हेही वाचा -

मित्र-म्हाडा अॅप सुरू

उपकरप्राप्त इमारतीच्या पुनर्विकासासाठी ५१ टक्के रहिवाशांची संमती


 

पुढील बातमी
इतर बातम्या