लोकलमध्ये चोरलेले मोबाइल विकणारी महिला अटकेत

मुंबईकरांची लाइफलाइन असलेली रेल्वे मोबाइल चोरांसाठी 'कुरण' ठरत आहे. लोकल असो किंवा एक्सप्रेस ... प्रवाशांच्या गर्दीत मोबाइल चोरी जोरात सुरू असते. गेल्या सहा वर्षांची आकडेवारी पहिली तर रेल्वेतील मोबाइल चोरी जवळपास हजारपटीने वाढली आहे. या भुरट्या चोरांचा माग काढत पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळण्यास सुरूवात केल्यानंतर या मागील एका महिलेचं नाव पुढं आलं आहे. शबनम अब्दुल रेहमान शेख (२६) असं या महिलेचे नाव असून पोलिसांनी तिला अटक केली आहे. या प्रकरणी वडाळा रेल्वे पोलिस अधिक तपास करत आहेत. 

रोज ३० मोबाइलची चोरी

मुंबईच्या हार्बर स्थानकांवर मोठ्या प्रमाणात मोबाइल चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली होती. या सराईत चोरांना रोखण्यासाठी पोलिसांनी अखेर या आरोपींवर संघटीत गु्नहेगारी (मकोका) लावण्याचे पाऊल उचलले. दिवसाला ही टोळी नाही म्हणाल तरी ३० एक मोबाइल चोरते. मात्र हे सर्व चोरलेले मोबाइल अखेर शबनमकडे सोपवले जातात. हे मोबाइल शबनम मस्जिद बंदरच्या मोबाइल दुकानात विकते. त्यानंतर त्या मोबाइलचे आईपी अॅड्रेस बदलून पुन्हा नागरिकांना कमी किमतीत विकले जातात. 

अाणखी ४ साथीदार

नुकतीच वडाळा रेल्वे पोलिसांनी विनोद मकवाना या सराईत आरोपीला मोबाइल चोरीच्या गुन्ह्यात अटक केली. त्याच्या चौकशीतून शबनमचे नाव पुढे आल्यानंतर पोलिसांनी शबनमला अटक केली. शबनमच्या चौकशीतून इतर चार साथीदारांची नावे पुढे आली. मोहम्मद फरहान खान उर्फ टकला. मोहम्मद आयुब खान उर्फ दाऊद, अल्तामश गुलाम नबी शहा उर्फ कवला, मोहम्मद अन्सरी अशी त्यांची नावे अाहेत.  

मोबाइल विक्रेता फरार

हे सर्व रे रोड परिसरात राहणारे असून त्यांच्यावर या पूर्वीही मोबाइल चोरीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. या आरोपींचा सध्या वडाळा रेल्वे पोलिस शोध घेत आहेत. हे सर्व चोरीचे मोबाइल खरेदी करणाऱ्या मस्जिदचा मोबाइल विक्रेता कादर शेख यांच्यावर विरोधातही पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून तो सध्या फरार आहे.  


हेही वाचा - 

सावधान! तुमचाही ई-मेल हॅक होऊ शकतो


पुढील बातमी
इतर बातम्या