सावधान! तुमचाही ई-मेल हॅक होऊ शकतो


सावधान! तुमचाही ई-मेल हॅक होऊ शकतो
SHARES

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत सध्या सायबर चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. कधी फोन करून, तर कधी हॅकिंगच्या माध्यमातून नागरिकांच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्या या सायबर चोरट्यांनी आता नागरिकांना ब्लॅकमेल करून लुबाडण्याचा नवीन मार्ग अवलंबला आहे. नुकतीच भायखळातील एका कस्टम अधिकाऱ्याला या चोरट्यांनी अशाच प्रकारे लक्ष केलं आहे. याप्रकरणी त्यांनी भायखळा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.


चोरट्यांनी दिली धमकी

भायखळा परिसरातील घोडपदेवचे रहिवाशी असलेले अभिमन्यू उज्वल हे मूळचे राजस्थानच्या जयपूरचे आहेत. घोडपदेव येथील म्हाडा संकुलमध्ये राहणारे उज्वल हे कस्टम विभागात निरीक्षक म्हणून काम करतात. काही दिवसांपूर्वी त्यांना एक अनोळखी ई-मेल आयडीहून मेल आला होता. त्यामध्ये चोरट्यांनी तुम्ही बीटकाॅईनवर ८३८ भरण्यास सांगितले होते.

पैसे न भरल्यास तुमच्या जवळच्या व्यक्तींना अश्लील मेसेज आणि फोटो पाठवण्याबाबतची धमकीही देण्यात होती. सुरुवातीला उज्वल यांनी या ई-मेलकडे दुर्लक्ष करत तो मेलच डिलिट केला. मात्र काही तासातच दुसरा ई-मेल आला. त्यानंतर उज्वल यांनी त्यांना आलेले सर्व ईमेल तपासले असता. मार्च महिन्यांपासून सायबर चोरट्यांनी त्यांचे ई-मेल हॅक करून त्यांच्यावर पाळत ठेवून होते.


पोलिसांची घेतली मदत

या प्रकरणानंतर त्यांनी तातडीने भायखळा पोलिस ठाण्यात धाव घेत पोलिसांची मदत घेतली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी नागरिकांना सायबर चोरट्यांपासून सावध राहण्याचं आवाहन केलं आहे. तसेच आपला ई-मेलआयडी आणि पासवर्ड कुणाशीही न शेअर करता. वेळोवेळी त्यामध्ये बदल करण्याचं आवाहन केलं आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा