सचिन वाझे यांना बडतर्फ करण्यासाठी हालचाली

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवण्याचं प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात एनआयएने अटक केलेले पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना मुंबई पोलीस दलातून निलंबित करण्यात आलं होतं. आता त्यांना पोलिस खात्यातून बडतर्फ करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

एखाद्या अधिकाऱ्याच्या वागणुकीमुळे पोलिस दलास डाग लागत असेल तर त्याच्याबाबत योग्य ती विभागीय चौकशी करून बडतर्फ करण्याचा अधिकार पोलिस आयुक्तांना संविधानाने दिला आहे. त्यानुसार वाझे यांना पोलिस दलातून बडतर्फ करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जात असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. तपास यंत्रणांकडून आलेले अहवाल, विभागीय चौकशी आणि कायदेशीर सल्ला घेऊन त्यावर निर्णय घेण्यात येणार आहे.

वाझे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटके  ठेवण्याचा कट आखणे, या कटाची अंमलबजावणी करणे, तपास सुरू होताच पुरावे नष्ट करणे आदी आरोप त्यांच्यावर करण्यात आले आहेत.

मनसुख हिरेन हत्या प्रकरणाच्या तपासात एनआयएने पुरावे म्हणून तब्बल ८०० सीसीटिव्ही फुटेज पडताळून वाझे विरोधात ठोस पुरावे ताब्यात घेतले आहेत. या संपूर्ण प्रकरणात एनआयएने आतापर्यंत चाळीसहून अधिक जणांचे जबाब नोंदवले असून ८ जणांना साक्षीदार केलं आहे.

भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३११ (२) (बी) अंतर्गत बेशिस्त वर्तवणूक असलेल्या पोलिसाला बडतर्फ करण्याचा विशेषाधिकार आयुक्तांना असला तरी याचा फार क्वचित वापर केला जातो. राज्य पोलीस दलात बडतर्फीचे प्रमाण कमी आहे. बहुतांश प्रकरणांमधील शिक्षा निलंबन, प्राथमिक आणि विभागीय चौकशीपर्यंत मर्यादित राहते. पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्त पदाच्या कार्यकाळात देवनार पोलीस ठाण्यात नियुक्त निरीक्षक दत्ता चौधरी यांना बडतर्फ केलं हेातं.

निरीक्षक दत्ता चौधरी यांनी सत्र न्यायालय, वरिष्ठ अधिकारी यांनी दिलेले आदेश पाळले नसल्याचे समोर आले. त्यांचे वर्तन संशयास्पद आणि गंभीर असून, पोलिस सेवेसाठी योग्य नसल्याचा ठपका ठेवत जयस्वाल यांनी बडतर्फ केले. लॉटरी विक्रेत्याचे अपहरण करून त्याच्याकडून खंडणी उकळल्याचा आरोप असलेल्या उपनिरीक्षक रामचंद्र जाधव यांच्यावरही जयस्वाल यांनी बडतर्फीची कारवाई केली होती.



हेही वाचा - 

सचिन वाझे आणखी दोघांची हत्या करणार होते, तपास यंत्रणांना संशय

पाण्याचा वापर जपून करा; मुंबईला ७ ऑगस्टपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक

पुढील बातमी
इतर बातम्या