Mumbai Local Update: लोकलमध्ये मोबाइल चोरांचा सुळसुळाट

मुंबई लोकलनं प्रवास करताना प्रवाशांना अनेक त्रासांना सामोरं जावं लागतं. अशातच आता लोकलमध्ये चोरांचा सुळसुळाट वाढला आहे. मात्र या सर्व त्रासातून प्रवाशांची सुटका करण्यासाठी मोबाइल चोरांचे आव्हान स्वीकारत रेल्वे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं धडक कारवाई सुरू केली. त्यानुसार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते दादर दरम्यान मोबाइल चोर असलेला सराईत गुन्हेगार माजिद शेख (२०) याला पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत पोलीसांनी त्याच्याकडून २० स्मार्ट फोन जप्त केले आहेत.

गुन्हे शाखा पोलिसांच्या पथकानं विविध स्थानकांतील, रेल्वे गाडीत चोरीचे सीसीटीव्ही फूटेज प्राप्त केले. यानुसार तपासचक्रे वेगाने फिरवत खबऱ्यांकडून माहिती मिळवण्यास सुरुवात केली. यातच मशीद रेल्वे स्थानकात चोरीचे मोबाइल विकण्यासाठी तरुण येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानुसार सापळा रचून मोबाइलसह आरोपी माजिद शेखला ताब्यात घेतले.

यावेळी त्याच्याकडून तीन स्मार्टफोन जप्त करण्यात आले. पोलिसांच्या प्रश्नांची योग्य उत्तरे देऊ न शकल्याने त्याला पोलिस ठाण्यात आणण्यात आले. सीएसएमटी रेल्वे पोलिस ठाण्यात त्याची चौकशी केली असता, त्याने मोबाइल चोरीची कबुली दिली.

आरोपीच्या माहितीवरून विविध ठिकाणावरून एकूण २० स्मार्टफोन हस्तगत करण्यात आले. हे सर्वच मोबाइल चोरीचे आहेत. यांची बाजारातील किंमत अडीच लाखांहून अधिक आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या