रोहित आर्याच्या एनकाऊंटर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित

रोहित आर्याचा गुरुवारी एनकाऊंटर केल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मुलांची सुटका करताना त्याला ठार मारणे खरंच आवश्यक होते का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. या प्रकरणी पोलिस अधिकाऱ्यांमध्ये वेगवेगळी मते दिसत आहेत.

काही नामांकित एनकाऊंटर अधिकाऱ्यांनी ही कारवाई योग्य असल्याचे सांगितले आहे, तर अनेक माजी अधिकाऱ्यांनी हा एनकाऊंटर चुकीचा असल्याचे मत व्यक्त केले आहे.

गुरुवारी दुपारी रोहित आर्य (50) यांनी एका शॉर्ट फिल्मच्या मुलाखतीसाठी पवाईतील स्टुडिओमध्ये दोन लोकांसह 17 मुलांना ओलीस ठेवले होते. या कारवाईदरम्यान पोलिसांच्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला. आर्याकडे फक्त एअरगन आणि काही केमिकल्स होते. प्रत्यक्षात तो धोकादायक वाटत नसल्यास, मग त्याला का मारण्यात आले? असा प्रश्न आता विचारला जात आहे.

माजी पोलीस महानिरीक्षक सुधाकर सुराडकर यांनी ही कारवाई अयोग्य असल्याचे सांगितले. तो एकटाच होता. त्याला काबूत आणणे शक्य होते. त्याने पोलिसांवर गोळीबार केला नव्हता किंवा हल्लाही केला नव्हता. मुलांची सुटका आधीच झाली होती. त्यामुळे त्याला गोळी घालणे चुकीचे होते, असे त्यांनी म्हटले. अक्षय शिंदे प्रकरणासारखाच प्रकार येथे झाला, अशीही त्यांनी टिप्पणी केली.

तर माजी एनकाऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांनी मात्र ही कारवाई योग्य ठरवली. त्याच्या हातात एअरगन होती. सुरुवातीला त्याच्याकडे नेमके कोणते शस्त्र आहे हे स्पष्ट नव्हते. तो मुलांना धोका पोहोचवू शकत होता, त्यामुळेच गोळीबार करणे योग्य होते, असे त्यांनी म्हटले.

पवाई पोलिसांनीही सांगितले की आरोपीने सीलबंद ऑडिटोरियममध्ये मुलांना ओलीस ठेवले होते. त्याने ज्वलनशील पदार्थही पसरवले होते. तो मानसिकदृष्ट्या अस्थिर होता. तो काहीही करू शकत होता. त्यामुळे त्याच्यावर गोळीबार करावा लागला.

एनकाऊंटर मृत्यू

पोलिस दलात ‘एनकाऊंटर’ असा कोणताही कायदेशीर प्रकार नाही. गुन्हेगारांना एनकाऊंटरमध्ये मारावे, अशी कोणतीही तरतूद कायद्यात नाही. मात्र पोलिसांवर हल्ला झाल्यास स्वसंरक्षणासाठी पोलिसांना गोळीबार करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे पोलिस आरोपीने हल्ला केला व स्वसंरक्षणात गोळीबार झाला, असा दावा करतात. त्यामुळे अशा अनेक घटना वादग्रस्त ठरल्या आहेत.


हेही वाचा

रोहित आर्याचे दीपक केसरकरांसोबत कनेक्शन काय?

पवईत 17 मुलांना हॉस्टेज ठेवणाऱ्या रोहित आर्यचा एन्काऊंटर

पुढील बातमी
इतर बातम्या