पवईत 17 मुलांना हॉस्टेज ठेवणाऱ्या रोहित आर्यचा एन्काऊंटर

ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा एन्काऊंटर

पवईत 17 मुलांना हॉस्टेज ठेवणाऱ्या रोहित आर्यचा एन्काऊंटर
SHARES

मुंबईतील (Mumbai) पवईत एका व्यक्तीने अनेक मुलांना ओलीस ठेवल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

ओलीस ठेवण्यात आलेली सर्व मुले 15 वर्षांखालील असून 17 मुला-मुलींना एका खोलीत बंद करुन ठेवण्यात आले होते. या मुलांसह 2 पालकही खोलीत बंद होते. याबाबत माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस आणि NSG कमांडो पोहोचले. त्यानंतर अग्निशमन दल आणि पोलिसांच्या (Police) मदतीने अखेर ओलीस ठेवणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेत मुलांची सुटका करण्यात आली.

यावेळी, आरोपी आणि पोलिसांमध्ये चकमक झाली असून पोलिसांच्या चकमकीत आरोपी रोहित आर्यचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. 

मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा एन्काऊंटर झाला असून आरोपीने पोलिसांवर गोळी झाडल्यानंतर पोलिसांनीही जशास तसं प्रत्युत्तर दिलं. त्यावेळी, आरोपीच्या छातीत गोळी लागली होती. त्यामुळे, रोहित आर्यला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेनं मुंबईसह राज्यभरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, पवई पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वाघमारे यांनी किडनॅपर रोहित आर्यवर गोळीबार केला होता.

सध्या शाळेला दिवाळीच्या सुट्ट्या असल्याने पालक आपल्या मुलांना वेगवेगळ्या कोर्सेसला किंवा इतर अॅक्टीव्हीसाठी गुंतवून ठेवत आहेत. त्यातच, मुंबईच्या पवई येथील RA स्टुडिओत काही शाळकरी मुले गेल्या 4-5 दिवसांपासून प्रशिक्षणसाठी येत होती.

मात्र, ऑडिशनच्या नावाखाली येथील स्टुडिओत किडनॅपरने शाळकरी मुलांना डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली. या घटनेनं मुलांच्या पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. ऑडिशनसाठी आलेल्या मुलांना दुपारी 2 वाजताच्या सुमारास जेवणासाठी सोडण्यात आल्यानंतर रोहित आर्य या व्यक्तीने मुलांना एका खोलीत कोंडून ओलीस ठेवले. 



Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा