ऐन पावसाळ्यात पोलिस कुटुंबिय बेघर, पीडब्ल्यूडीने पाठवली घर खाली करण्याची नोटीस

पोलिस वसाहतींच्या दुरवस्थेच्या एक-एक कहाण्या समोर येत असताना, ऐन पावसाळ्यात साकीनाका पोलिस वसाहतीतील इमारतींना सार्वजनिक बांधकाम खात्याने धोकादायक इमारत घोषित करत वसाहतीतील पोलिस कुटुंबियांना इमारत रिकामी करण्याची नोटीस बजावली आहे. त्यामुळे सुमारे ३०० पोलिस कुटुंबांवर बेघर होण्याचं संकट ओढवलं आहे.

२४ वर्षे जुन्या इमारती

म्हाडाने १९९४ ते ९५ दरम्यान साकीनाका इथं बांधून दिलेल्या ५ इमारतीमध्ये पोलिस कुटुंबिय राहतात. यापैकी ३ इमारतींची पडझड झाल्याने पोलिस कुटुंबियांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दुरूस्तीसाठी तक्रारी दाखल केल्या होत्या. परंतु या तक्रारींवर काहीच कारवाई करण्यात आली नाही. परंतु कालपासून मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसात अनेक ठिकाणी दुर्घटना घडू लागल्यानंतर अचानक या इमारती खाली करण्यास सांगितलं आहे.  

इमारत खाली करण्याचं पत्र

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आलेलं हे पत्र पोलिस आयुक्तांनी तात्काळ साकीनाका पोलिस ठाणे विभागातील वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना पाठवलं. त्यानुसार पोलिसांनी रविवारी रात्री १० वाजता संबधित रहिवाशांना इमारत धोकादायक असल्याचं कळवत रिकामी करण्यास सांगितलं. यामुळे पोलिस कुटुंबियांमध्ये चिंतेचं वातावरण आहे

स्ट्रक्चरल आॅडिट

सार्वजनिक बांधकाम खात्याने मे महिन्यात १५, १७, २८, २९, ३० या ५ इमारतींचं स्ट्रक्चरल ऑडिट केलं होतं. या आॅडिटमध्ये विभागाने साकीनाका पोलिस वसाहतीतील ५ पैकी २८, २९ आणि ३० क्रमांकांच्या इमारतींची मोठी संरचनात्मक झीज झाल्याचा अहवाल आयुक्तांकडे काही पाठवला होता. आयुक्तालयाने या अहवालाकडे दुर्लक्ष केलं. 

जबाबदारी झटकली

सध्या मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसात इमारत दुर्घटनाग्रस्त झाल्यास अंगलट येवू नये या उद्देशाने आयुक्तालयाने रविवारी रात्री नोटीस पाठवून हात वर केल्याचं रहिवाशांचं म्हणणं आहे. तसंच पर्यायी घरांसाठी ई-आवास योजनेअंतर्गत अर्ज करण्याच्या सूचना आयुक्तालयातून पोलिस कुटुंबियांना देण्यात आल्या आहेत.


हेही वाचा-

मुंबईत अतिवृष्टी! फक्त ३ दिवसांत पडला जून महिन्याएवढा पाऊस

पावसाळ्यात तक्रारींचा पाऊस, अग्निशमन दलातील ९२७ पदे अद्याप रिक्तच


पुढील बातमी
इतर बातम्या