अशोक सावंत यांच्या मारेकऱ्याला अटक, तिघेजण फरार

शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि मागाठणेचे विधानसभा प्रमुख अशोक सावंत यांच्या दोन मारेकऱ्यांना २४ तासांच्या आत पकडण्यात समता नगर पोलिसांना यश आलं आहे. पोलिसांनी पकडलेल्या एका मारेकऱ्याचं नाव सुहेल भेदीयासह असं असून आणखी एकाला पोलिसांनी याप्रकरणी अटक केली अाहे. तर अन्य तीन जण फरार आहेत. त्यातील गजानन उर्फ गजा पवारची अोळख पटली असून दुसऱ्या मारेकऱ्याची अोळख अद्याप पटलेली नाही. या दोन्ही फरार मारेकऱ्यांचा शोध सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

नोकरीवरून काढून टाकल्याने हत्या?

सावंत यांचा केबलचा व्यवसाय होता. या व्यवसायातील पूर्ववैमनस्यातून तसेच नोकरीवरून काढून टाकल्याच्या रागातून चार मारेकऱ्यांनी सावंत यांची हत्या केल्याचं सांगितलं जात आहे. तसंच एसअारएच्या एका प्रकल्पाच्या वादातून सुपारी देऊन ही हत्या करण्यात अाल्याचं बोललं जात अाहे. 

कशी झाली हत्या?

कांदिवलीच्या ठाकूर काॅम्प्लेक्स परिसरात राहणारे शिवसेनेचे माजी नगरसेवक अशोक सावंत रविवारी रात्री आपल्या मित्रासोबत दुचाकीहून घरी परतत होते. त्यावेळी मागून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी सावंत यांच्या दुचाकीला लाथ मारली. अचानक झालेल्या या घटनेने सावंत आणि त्यांचे मित्र दुचाकीवरून खाली पडले. सावंत यांचे मित्र दुचाकीला लाथ मारणाऱ्यांना पकडण्यासाठी त्यांच्या मागे पळाले असता संधीचा फायदा घेऊन रिक्षातून आलेल्या तीन अज्ञात व्यक्तींनी सावंत यांच्यावर चाकूने वार केले. या हल्ल्यात सावंत यांचा मृत्यू झाला.

आरोपी 'असा' सापडला

याप्रकरणी तक्रारीची नोंद होताच पोलिसांनी त्वरीत तपासाला सुरूवात केली. इमारतीतील सीसीटीव्हीच्या माध्यमातून ज्या रिक्षातून हे आरोपी आले होते. त्या रिक्षाच्या नंबरप्लेटचा शोध घेत पोलिस सुहेलपर्यंत पोहोचले आणि त्याला अटक केली. तर अन्य तीन फरार आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.

कांदिवलीच्या समतानगर परिसरात अशोक सावंत हे शिवसेनेचे कट्टर नेते म्हणून ओळखले जायचे. सावंत दोन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तर त्यांच्या मुलीने एकदा नगरसेवकपद भूषवलं आहे.


हेही वाचा-

शिवसेनेचे माजी नगरसेवक अशोक सावंत यांची हत्या

पुढील बातमी
इतर बातम्या