शिवसेनेचे माजी नगरसेवक अशोक सावंत यांची हत्या


शिवसेनेचे माजी नगरसेवक अशोक सावंत यांची हत्या
SHARES

कांदिवलीच्या समतानगर परिसरातील शिवसेनेचे माजी नगरसेवक अशोक सावंत यांची रविवारी रात्री अज्ञातांनी चाकूने असंख्य वार करून निर्घृण हत्या केली. या प्रकरणी समतानगर पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अशोक सावंत यांच्या हत्येमुळे परिसरात तणावाचं वातावरण असून हत्येचं वृत्त कळाल्यानंतर शिवसैनिकांनी सावंत यांच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी केली.


नेमकं काय झालं?

कांदिवलीच्या ठाकूर काॅम्प्लेक्स परिसरात राहणारे शिवसेनेचे माजी नगरसेवक अशोक सावंत रविवारी रात्री आपल्या मित्रासोबत दुचाकीहून घरी परतत होते. रात्रीची वेळ असल्याने रस्त्यार फारशी गर्दी नव्हती. त्यावेळी मागून दुचाकीहून आलेल्या दोघांनी सावंत यांच्या दुचाकीला लाथ मारली. यामुळे सावंत बसलेल्या दुचाकीचं नियंत्रण सुटल्याने ते पडले. सावंत यांचा मित्र दुचाकीला लाथ मारणाऱ्यांना पकडण्यासाठी त्यांच्या मागे पळाले. याच संधीचा फायदा घेत रिक्षातून आलेल्या तीन अज्ञात व्यक्तींनी सावंत यांच्यावर चाकूने असंख्य वार केले. सावंत यांनी मदतीसाठी आरडा ओरडा केल्यानंतर हल्लेखोरांनी तिथून पळ काढला. त्यानंतर स्थानिकांनी सावंत यांना तातडीने कांदिवलीच्या साई रुग्णालयात नेलं. मात्र डाॅक्टरांनी अशोक सावंत यांना तपासून मृत घोषीत केलं.


सीसीटीव्ही फुटेज ताब्यात

पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तर सावंत यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात पाठवला. हल्लेखोरांची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी परिसरातील इमारतींचे सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेतले आहेत. अशोक सावंत मुंबई पोलिस दलातील दहशतवाद विरोधीपथकात सहाय्यक पोलिस आयुक्तपदावर कार्यरत असलेले सुभाष सावंत यांचे भाऊ आहेत.



अशोक सावंत यांची पार्श्वभूमी

कांदिवलीच्या समतानगर परिसरात अशोक सावंत हे शिवसेनेचे कट्टर नेते म्हणून ओळखले जायचे. सावंत दोन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. कालांतराने हा वॅार्ड महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्याने मार्च २०१२ ते २०१७ पर्यंत त्यांची मुलगी प्राजक्ता सावंत-विश्वासराव या नगरसेविका होत्या. त्यानंतर मार्च २०१७ ला पालिकेच्या पोट निवडणुकीत सावंत आणि त्यांची मुलगी प्राजक्ता हे दोघेही सेनेच्या तिकिटावर उभे होते. पण यावेळी दोघांचा पराभव झाला.

त्यानंतर सावंत मागठाणे येथील विधानसभाप्रमुख म्हणून कार्यभार संभाळत होते. सोबत त्यांचा केबलचाही व्यवसाय होता. परिसरातील पुनर्विकास प्रकल्पावरून मागील अनेक दिवसांपासून सावंत यांना फोनवर धमक्या येत होत्या. या वादातूनच ही हत्या झाल्याचे सांगण्यात येत आहे. सावंत यांच्या हत्येमुळे परिसरात तणावाचं वातावरण आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा