मुख्यमंत्र्यांवर फेसबुकवर कमेंट करणं पडलं भारी, शिवसैनिकांनी तरुणाचं केलं मुंडन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात फेसबुकवर कमेंट केल्याप्रकरणी वडाळा परिसरात शिवसैनिकांनी एका व्यक्तीला मारहाण करत, त्याचं मुंडन केल्याची घटना समोर आली आहे.  हिरामणी तिवारी असं या व्यक्तीचं नाव असून त्याने वडाळा टीटी पोलिसात अनोळखी शिवसैनिकांविरोधात तक्रार नोंदवली आहे. मात्र घडलेल्या प्रकारामुळे परिसरात तणावाचं वातावरण असल्याने पोलिसांनी तिवारी याला १४९ अन्वये नोटीस पाठवली आहे.

जामिया विद्यापीठातील हिंसाचारप्रकरणी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली होती. जामिया विद्यापीठातील हिंसाचार जालियानवाला बाग हिंसाचाराची आठवण करून देणारा आहे, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर ताशेरे ओढले होते. उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर तिवारीने फेसबुकवर एक पोस्ट टाकली होती. या पोस्टमध्ये तिवारीने उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह टिपण्णी केली होती.

 या पोस्टनंतर स्थानिक शिवसैनिकांनी तिवारी याचं घर गाठून त्याला मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता त्यांनी तिवारीचं मुंडन केलं. या प्रकरणी तिवारी याने शिवसैनिकांविरोधात वडाळा टीटी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. मात्र तिवारीच्याया वादग्रस्त पोस्टमुळे परिसरात संतापाचं वातावरण पसरल्यामुळे पोलिसांनी तिवारी यालाही १४९ अन्वये नोटीस पाठवली आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत. 


हेही वाचा -
राज्यमंत्रीमंडळ विस्तारात ३६ मंत्री घेणार शपथ ?
शरद पवारांच्या 'त्या' मागणीला रामदास आठवलेंचा पाठिंबा


पुढील बातमी
इतर बातम्या