कुर्ला इथं गुंडाची गोळ्या घालून हत्या

कुर्लामधील हलवा पूल येथे पूर्ववैमनस्यातून जानू पवार उर्फ बिल्ला या गुंडाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. मंगळवारी सकाळी ही घटना घडली असून त्यानंतर परिसरात भितीचं वातावरण पसरलं होतं. मारेकऱ्यांची ओळख पटली असून विनोबा भावे नगर पोलिसांनी बिल्लाचा सावत्र भाऊ विनोद पवार याला ताब्यात घेतलं आहे.

बिल्लाची दहशत

कुर्लातील विनोबा भावे परिसरात बिल्लाची मोठी दहशत होती. नागरिकांना धमकावणं, मारहाण करणं या सारख्या असंख्य गुन्ह्यांची नोंद मुंबईतल्या विविध पोलिस ठाण्यात बिल्लावर आहे. तेथील एका दुसऱ्या टोळीसोबत त्याचा वाद सुरू होता. काही दिवसांपूर्वीच बिल्ला जामीनावर बाहेर आला होता. मंगळवारी सकाळी बिल्ला हलवा पूल येथून जात असताना दुचाकीहून आलेल्या दोघांनी त्याच्यावर दोन गोळ्या झाडल्या. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या बिल्लाला जमावाने तातडीने सायन रुग्णालयात नेले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

यामुळे केली हत्या

 या घटनेची माहिती मिळताच विनोबा भावे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा नोंदवला आहे. पूर्ववैमनस्यातून ही हत्या करण्यात आली असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं.  बिल्लाने विनोदचा भाऊ दिपक पवार याची काही वर्षांपूर्वी हत्या केली होती. त्याच वादातून बिल्लाची हत्या केल्याचं बोललं जातं. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत. 


हेही वाचा - 

चंदा कोचर यांची ११ तास ईडीकडून चौकशी


 

पुढील बातमी
इतर बातम्या