आयपीएल बेटिंग: बुकी सोनू जलानला लावणार मकोका!

  • मुंबई लाइव्ह टीम & सूरज सावंत
  • क्राइम

आयपीएल तसंच क्रिकेटच्या इतर स्पर्धांवर जगभरातून सट्टा घेणारा कुख्यात बुकी सोनू योगेंद्र जलान (४१, मालाड) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणीविरोधी पथकाने मंगळवारी रात्री अटक केली. त्याच्या विरोधात नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेता ठाणे पोलिस आता सोनूवर मकोका अंतर्गत गुन्हा नोंदवणार असल्याचं कळतं आहे.

डोंबिलीतून सट्टेबाज ताब्यात

आयपीएलवर डोंबिवलीत सट्टा खेळला जात असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांना मिळाली होती. त्याआधारे रामनगर परिसरातून १६ मे रोजी शर्मा यांच्या पथकाने गौतम सावला (५५), निखिल (२५, रा. दोघेही डोंबिवली) आणि नितीश पुंजानी (५५, रा. ठाणे) यांना अटक केली. त्यांच्याकडून सट्ट्यासाठी वापरलेली सामग्रीही जप्त केली होती. त्यांच्याच माहितीच्या आधारे पुढे खुशाल रामा भिया (४०, मालाड) आणि बिट्टू व्रजेश जोशी (२७, मुलुंड) या दोघांना मुंबईतून अलिकडंच ठाणे खंडणीविरोधी पथकाने अटक केली.

'अशी' केली सोनूला अटक

सोनू जलान याचीही माहिती मिळाल्यानंतर त्याला २९ मे रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास शर्मा यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे, उपनिरीक्षक रोशन देवरे आदींच्या पथकाने मुंबईतून अटक केली. सोनूवर मालाड (२००८), ओशिवरा (२०११), समाजसेवा शाखा (२०११), तर २०१५ मध्ये दिल्ली आणि अहमदाबाद येथील पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत.

अवैध धंद्यांना लगाम

कासारवडवली आणि डोंबिवलीच्या रामनगर पोलीस ठाण्यातही त्यांच्यावर क्रिकेटवर सट्टा लावल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहे. या संघटीत गुन्हेगारी प्रकरणी सोनूवर आता ठाणे पोलिस मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करून कडक कारवाई करणार आहे. सोनूच्या या अवैध धंद्यांना लगाम लावण्याचा प्रयत्न पोलिसांचा असणार आहे.


हेही वाचा-

अायपीएल सट्टेबाजीप्रकरणी अभिनेता अरबाझ खानला समन्स

असा खेळला जातो क्रिकेट सामन्यांवर सट्टा!


पुढील बातमी
इतर बातम्या