वज्रेश्वरी मंदिरावर दरोडा टाकणारे ५ दरोडेखोर जेरबंद

भिवंडीतील श्री वज्रेश्वरी योगिनी देवी मंदिरात सशस्त्र दरोडा टाकणाऱ्या ५ दरोडेखोरांना बेड्या ठोकण्यात ठाणे ग्रामीण पोलिसांना यश आलं आहे. गोविंद गिंभल, विनीत चिमडा, भारत वाघ, जगदीश नावतरे आणि प्रवीण नावतरे अशी या दरोडेखोरांची नावे आहेत. अजून ३ दरोडेखोर फरार आहेत. या दरोडेखोरांकडून पोलिसांनी २ लाख ८३ हजार रुपये जप्त केले आहेत.

हे सर्व दरोडेखोर ठाणे तसंच पालघर जिल्ह्यातील राहणारे आहेत. या दरोडेखोरांनी दरोड्याच्या काही दिवस आधी वज्रेश्वरी देवी मंदिराची रेकी केली होती. त्यानंतर  १० मे रोजी पहाटे मंदिराच्या सुरक्षा रक्षकाला बांधून ठेवत, दानपेट्या फोडत सशस्त्र दरोडा टाकला होता. या दानपेट्यांतून दरोडेखोरांनी ७ लाख १० हजार रुपयांची रोकड चोरुन नेली होती.

या दरोड्यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली होती. तेव्हापासून पोलिसांनी विशेष पथकं तयार करून ठाणे जिल्ह्याबाहेर दरोडेखोरांचा शोध सुरू केला. पोलिस खबऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दरोडेखोर शहापूर आणि दादर व नगर हवेली परिसरात लपून बसले होते. त्यानुसार पोलिसांनी या दरोडेखोरांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतलं.


हेही वाचा-

नायजेरियन ड्रग्ज तस्करांना आरेतून अटक


पुढील बातमी
इतर बातम्या