लग्नानंतर अवघ्या 48 दिवसांत विवाहितेची आत्महत्या

ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथे 26 वर्षीय विवाहितेने लग्नानंतर अवघ्या 48 दिवसांत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पती, सासू आणि दीर यांच्याविरोधात मानसिक आणि शारीरिक छळ तसेच आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पतीला अटक करण्यात आली आहे.

मृत महिलेची ओळख विशाखा टिळकर अशी असून तिचा विवाह 30 एप्रिल 2026 रोजी नितीन टिळकर याच्यासोबत झाला होता. मात्र लग्नानंतर काही दिवसांतच तिचा छळ सुरू झाल्याचा आरोप माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे.

कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, लग्नात मिळालेल्या मानपान आणि भेटवस्तूंवरून सासरच्या मंडळींनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर विशाखावर माहेरहून पैसे आणि दागिने आणण्याचा दबाव टाकण्यात येत होता. या मागण्यांमुळे तिचा सातत्याने मानसिक छळ केला जात होता.

विशाखाच्या नातेवाईकांनी आणखी गंभीर आरोप करत सांगितले की, पती नितीन टिळकर याने अंबरनाथमधील घराच्या आत आणि बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते. या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून विशाखाच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवले जात होते. त्यामुळे तिच्या खासगी आयुष्यावर मोठा परिणाम झाला होता.

तसेच तिला शेजाऱ्यांशी मोकळेपणाने बोलण्यासही मज्जाव करण्यात आला होता. शेजारी किंवा इतर लोकांशी संवाद साधल्यास तिच्याशी वाद घालण्यात येत असे आणि मारहाणही केली जात होती, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. मृत्यूच्या दोन दिवस आधी एका महिला शेजारीशी बोलल्यामुळे तिची मारहाण करण्यात आल्याचाही दावा करण्यात आला आहे.

विशाखाने सासरी होत असलेल्या त्रासाबाबत आपल्या आईला माहिती दिली होती. तिची परिस्थिती समजल्यानंतर तिला माहेरी परत आणण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला होता. मात्र त्याआधीच तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे.

या घटनेनंतर अंबरनाथमधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पती नितीन टिळकर, सासू छाया टिळकर आणि दीर निनाद टिळकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त करणे, मानसिक आणि शारीरिक छळ यांसह विविध कलमांखाली गुन्हा नोंदवला असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.


हेही वाचा

एफडीएच्या भीतीने कालबाह्य पदार्थ रस्त्यावर फेकले

पुढील बातमी
इतर बातम्या