मुंबईत व्हायला आला हिरो, बनला चोर!

मुंबईतून कोकणात सुटणाऱ्या एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांच्या मौल्यवान दागिन्यांची चोरी करणाऱ्या २ सराईत आरोपींना रेल्वे पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. मोहम्मद सैफ अजगर अली चौधरी (३२) आणि साबीर अझरूद्दीन शेख अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांवर मुंबईच्या विविध रेल्वे पोलिस ठाण्यात १६ गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती पोलिस उपायुक्त मकानदार यांनी दिली. चौधरी मुंबईत हिंदी सिनेमा आणि सिरियलमध्ये काम करण्यासाठी मुंबईत आला होता. मात्र कुठेच काम मिळत नसल्यामुळे नैराश्येतून तो चोरी करू लागल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली आहे. या दोघांना न्यायालयाने १० दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.  

'अशी' करायचे चोरी

मुंबईच्या रेल्वे पोलिसांनी चौधरीला रेल्वे स्थानकावर संशयास्पदरित्या फिरताना ताब्यात घेतलं होतं. त्याची चौकशी केली असता त्याने कोकणात जाणाऱ्या एक्स्प्रेस सिग्नल अथवा स्थानकादरम्यान धीम्या गतीने धावत असताना खिडकीवर बसलेले, दरवाजात उभे असलेल्या प्रवाशांच्या अंगावरील दागिने हिसकावून पळ काढत असल्याचं सांगितलं. हे काम तो त्याचा सहकारी साबीरसोबत करत असल्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली.

मुंबईत राहायचे

या दोघांवर मुंबईच्या ठाणे रेल्वे पोलिस ठाण्यात ८, सीएसएमटी रेल्वे पोलिस ठाण्यात ४ आणि दादर व कुर्ला रेल्वे पोलिस ठाण्यात ४ गुन्ह्यांची नोंद आहे. या दोघांकडून पोलिसांनी १२ लाख ९५ हजारांचा ऐवज हस्तगत केला आहे. हे दोघेही मूळचे उत्तर प्रदेशच्या गाझीयाबादचे राहणारे आहेत. ते मुंबईत एका महिन्यासाठी खोली भाड्याने घेऊन रहायचे आणि चोऱ्या करून पुन्हा त्याच्या मूळ गावी पळून जायचे. मागील २ महिन्यांपासून रेल्वे पोलिस या दोघांच्या मागावर होते.


हेही वाचा-

हिमालय पूल दुर्घटनेप्रकरणी मुंबई पोलिसांकडून आरोपपत्र सादर


 

पुढील बातमी
इतर बातम्या