बनावट ईमेलच्या मदतीने कंपनीला कोट्यवधीचा गंडा

कुलाबा येथील विल्को कंपनीला बनावट ई-मेलच्या मदतीने कोट्यवधी रुपयांना गंडवल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. याप्रकरणी कंपनीचे मालक अजय शहा यांनी कुलाबा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली असून पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.

1 कोटी 70 लाखांची फसवणूक

नेपियन्सी रोडच्या सागरकुंज येथे राहणाऱ्या अजय शाह यांची कुलाब्यात विल्को नावाची कंपनी आहे. त्या कंपनीत आर्थिक व्यवहार पाहणाऱ्या कर्मचाऱ्यासारखा बनावट ईमेल आयडी बनवून अनोळख्या चोरट्यांनी कंपनीशी व्यवहार करणाऱ्या कंपन्यांना संपर्क साधला. 

तसंच कंपन्यांकडून मिळणारा मोबदला विल्को कंपनीच्या अधिकृत खात्याच्या जागी खासगी बँकेतील खात्यावर वळवत कंपनीची 1 कोटी 70 लाखांची फसवणूक केली. व्यवहार करण्यात आलेल्या एका कर्मचाऱ्याने विल्को कंपनीला भेट देऊन चौकशी केल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला.

आरोपीविरोधात गुन्हा दाखल

याबाबतची माहिती शाह यांना त्याच्या कंपनीतील अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर शहा यांनी कुलाबा पोलिस ठाण्यात यासंदर्भात भा. दं. वि. कलम ४१९, ४२० आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी आरोपीचा शोध पोलिस घेत आहेत. ज्या खात्यावर पैसे वळवण्यात आले त्याची माहिती पोलिसांनी हस्तगत केली आहे. मात्र हे खातं बनावट असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.


हेही वाचा -

क्रिस्टल टाॅवर आग: सुपारीवाला बिल्डरला २७ आॅगस्टपर्यंत पोलिस कोठडी

पुढील बातमी
इतर बातम्या