ज्येष्ठ अभिनेत्रीवर अत्याचार करणारा अटकेत

७० च्या दशकातील एका प्रसिद्ध अभिनेत्रीला त्रास देणाऱ्या आरोपीला गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सर्फराज उर्फ अमर खन्ना असं या आरोपीचं नाव आहे. जुहू पोलिसांनी काही दिवसांपूर्वी सर्फराज विरोधात गुन्हा नोंदवला होता. कालांतराने हे प्रकरण गुन्हे शाखा ९ कडे वर्ग करण्यात आलं होतं. अमर खन्नाला अटक करण्यात आली असून आता त्याला शुक्रवारी न्यायालयात हजर करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

नक्की काय आहे प्रकार?

मागील अनेक वर्षांपासून ही अभिनेत्री आणि आरोपी सर्फराज उर्फ अमर खन्ना हे एकमेकांचे जवळचे मित्र होते. मात्र, २०१७ मध्ये दोघांमध्ये काही कारणास्तव वाद झाला. त्यानंतर या अभिनेत्रीने सर्फराजशी बोलणं बंद केलं होतं. तरीही सर्फराज या अभिनेत्रीला वारंवार फोन आणि व्हॉट्स अॅप मेसेज करून त्रास द्यायचा. एवढ्यावरच न थांबता सर्फराजने काही दिवसांपूर्वी या अभिनेत्रीच्या जुहू येथील घरी जबरदस्ती घुसण्याचाही तीन वेळा प्रयत्न केला. त्यावेळी सर्फराजने सुरक्षा रक्षकाशी वाद घातला.

वारंवार सर्फराजकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून या अभिनेत्रीने जुहू पोलिस ठाण्यात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी आरोपी विरोधात भा.दं.वि कलम ३५४(ड), ५०९ नुसार गुन्हा नोंदवला होता. हा गुन्हा पुढे अधिक तपासासाठी गुन्हे शाखा ९ कडे वर्ग करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना या अभिनेत्रीने पुढे येऊन सर्फराजने आपली फसवणूक करत आपल्यावर अत्याचार केले आणि आपल्याला धमकावत खंडणी देखील मागितल्याचा दावा केला. त्यानुसार गुन्हे शाखेने सर्फराजच्या पूर्वीच्या गुन्ह्यासोबतच नवीन गुन्हा वाढ करत भा.दं.वि कलम ३८३, ३७६, ४२०, ५०६, ५०९ अंतर्गत गुन्हा नोंदवला. दरम्यान, सर्फराजला शुक्रवारी न्यायालयात हजर करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.


हेही वाचा

अभिनेत्री झिनत अमानचा विनयभंग

पुढील बातमी
इतर बातम्या