ओला चालकाची पुन्हा मनमानी, तक्रार करून देखील ओलाने मात्र चालकाला घातलं पाठीशी

  • सचिन गाड & मुंबई लाइव्ह टीम
  • क्राइम

सध्या सुरु असलेली ओला चालकांची मनमानी आणि त्यांची अरेरावी थांबण्याचं नाव घेत नाहीये. या वेळी हॉस्पिटलमध्ये मेडिकल तपासणीसाठी जाणाऱ्या महिलेला चालकाच्या अरेरावीवाला सामोरं जावं लागलं असून, ओलाकडे तक्रार करून देखील ओलाने चालकावर कारवाई करण्याऐवजी महिलेचं अकाउंटच ब्लॉक केलं आहे. घडलेला हा सगळा प्रकार महिलेच्या मैत्रिणीने फेसबुकवर शेअर केला असून तो चांगलाच व्हायरल देखील झाला आहे.

नेमका काय घडला प्रकार?

पीडित महिलेच्या मैत्रिणीने फेसबुकवर टाकलेल्या पोस्टनुसार, एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या तिच्या मैत्रिणीने ओला बुक केली होती. या महिलेला नवी मुंबईवरून दक्षिण मुंबईतील हॉस्पिटलमध्ये मेडिकल तपासणी आणि रक्त चाचणीसाठी जायचं होतं आणि त्यासाठी ती १२ तासांपासून उपाशी देखील होती.

सोमवारी सकाळी या महिलेने ओला बुक केली. आठच्या सुमारास चालक लक्ष्मण वाघमारे याने ती असलेल्या ठिकाणी पोहोचल्याचा दावा केला. पण प्रत्यक्षात मात्र त्याचा कुठेच पत्ता नव्हता. चालक २० मिनिटे उशिरा आला. आधीच उशीर झाल्याने महिलेने चालक लक्ष्मण वाघमारे यांना घाई करण्यास सांगितले. त्यावर त्याने थेट आपण भाडं रद्द करत असल्याचं सांगितलं. महिलेने त्याला तिची परिस्थिती सांगितली. मला मेडिकल तपासणीसाठी जायचं असून मी १२ तासांपासून उपाशी असल्याचं देखील तिने चालकाला सांगितलं. 'माणुसकीच्या नावाखाली तरी मला हॉस्पिटलला सोड' अशी चालकाला विनवणी केली. तरी देखील वाघमारेने तिचं काहीएक ऐकलं नाही. 

   

कंटाळून महिलेने दुसरी कॅब बुक केली आणि दुसऱ्या कॅबच्या प्रतीक्षेत थांबली. तर, वाघमारेने तिला गाडीतून उतरण्यासाठी सांगितलं, म्हणजे तो दुसरं भाडं घेऊ शकेल. महिलेने उतरण्यास नकार देताच वाघमारेने गाडी पूर्ण जोरात पळवली. महिलेने त्याला गाडी थांबवण्यासाठी सांगितले. पण वाघमारेने ऐकलं नाही. चालकाने गाडी थांबवावी म्हणून महिलेने दरवाजा देखील उघडून बघितला. पार्किंग लाईट देखील दाबून बघितला. पण तरी देखील काहीच फरक पडला नाही. शेवटी महिलेने चालकाला फटका मारला. त्यानंतर चालक थांबल्याचं महिलेच्या मैत्रिणीने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं आहे. या सगळ्या प्रकाराने महिला एवढी धास्तावली होती, कि हॉस्पिटलला जाण्याऐवजी ती थेट घरी निघून गेली. 

उलटा चोर कोतवाल को डाँटे!

या सगळ्या प्रकाराची महिलेने ओलाकडे तक्रार केली. सुरुवातीला त्यांनी 'मदत करू' असं सांगितलं आणि 'पुढील कारवाईपर्यंत चालकाचं अॅप बंद करतो, जेणेकरून तो आणखीन भाडे घेऊ शकणार नाही', असं देखील सांगितलं. पण प्रत्यक्षात मात्र काहीच झालं नाही. उलट त्यांनी चक्क महिलेचंच अकाउंट ब्लॉक केलं.

चालकाला मारणं पॉलिसीविरोधात?

याबद्दल ओलाला विचारलं असता ओलाने दिलेलं उत्तर ऐकून महिलेला धक्काच बसला. चालकाला मारणं हे कंपनीच्या पॉलिसीविरोधात असल्याचं अजब उत्तर यावेळी ओलाकडून देण्यात आलं. चालकाने यावेळी तक्रार केल्याचं देखील ओलाने महिलेला सांगितलं.

या प्रकरणी 'मुंबई लाइव्ह'ने महिलेशी संवाद साधला असता, तिने चालकाला निलंबित करण्याची मागणी केली आहे.


हेही वाचा

चालकाला झोप लागल्याने ओला थेट समुद्रात

धक्कादायक! नवऱ्याने केला अनैसर्गिक सेक्स, सासू, नणंदेनं केलं चित्रीकरण

 

पुढील बातमी
इतर बातम्या