५० चोरीचे गुन्हे करणाऱ्या महिलेला अटक

मोलकरीण (Maid) बनून घर लुटणाऱ्या महिलेला मुंबई पोलिसांच्या मालमत्ता कक्षाने अटक केली आहे. या महिलेला २,५०० डॉलर्स चोरीच्या प्रकरणात पोलिसांनी (police) गजाआड केलं आहे. ही महिला मुंबईतील उच्चभ्रू वस्तीत मोलकरीण बनून घरातील लोकांचा विश्वास जिंकायची. त्यानंतर घरातील महागड्या वस्तू , देशी-परदेशी चलन, दागिणे चोरून पोबारा करायची. 

या महिलेला अटक केल्यानंतर पोलिसांना आश्चर्याचा धक्काच बसला. कारण  या महिलेला २००६ पासून तब्बल ५० वेळा वेगवेगळ्या चोरीच्या घटनांमध्ये पोलिसांनी अटक केलेली आहे. ती प्रत्येक वेळी नाव बदलून काम शोधायची, अशी माहिती समोर आली आहे. 

 जुहू पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुलमोहर रोड विलेपार्ले पश्चिम या ठिकाणी ही महिला  दीपिका आशीषकुमार गांगुली या महिलेच्या घरात काम करत होती. काही दिवसांनी तिने घरात असलेले १० हजार रुपये, २५०० अमेरिकन डॉलर यासह इतर मौल्यवान वस्तू चोरून जागेवरून पोबारा केला होता. दीपिका गांगुली यांनी २६ मे रोजी घरात चोरी झाल्याची तक्रार जुहू पोलीस ठाण्यात दिली होती. 

तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला. ही चोर महिला तिचे संपूर्ण नाव पत्ता व कोणतेही कागदपत्र घर मालकांना देत नसल्याचं समोर आलं. मात्र पोलिसांनी इमारतीच्या आवारात लावण्यात आलेले सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यातून ही महिला पोलीस रेकॉर्डवरील सराईत चोर उघडकीस आलं. 

पोलिसांनी तिचा शोध घेण्यासाठी मानखुर्द, वाशी नाका, चेंबूर, शिवाजीनगर, देवनार या भागात पाळत ठेवून तिला विक्रोळी येथे अटक केली. तिच्यावर मुंबईत विविध पोलीस ठाण्यामध्ये २००३ ते २०२० पर्यंत ५० हून अधिक गुन्हे दाखल असल्याचं समोर आलं आहे.

ही महिला वनिता उर्फ सुनिता, संगीता उर्फ आशा, मनिषा उर्फ उषा गायकवाड, अशा वेगवेगळ्या नावाने मुंबईतील वेगवेगळ्या परिसरातील उच्चभ्रू वस्तीत मोलकरणीचे काम करायची. दरवेळी गुन्हा केल्यानंतर आपल्या राहण्याचा पत्ता बदलत होती. तिने वनिता गायकवाड या नावाने सुरत, गुजरात येथेही चोरी केली आहे. 



हेही वाचा - 

पुढच्या २ ते ४ आठवड्यात महाराष्ट्रात तिसरी लाट येणार?; टास्क फोर्सची महत्वाची माहिती

मुंबईसाठी पुढील काही तास धोक्याचे; मुलुंडमध्ये भिंत कोसळून एकाचा मृत्यू

पुढील बातमी
इतर बातम्या