कुर्ला टर्मिनसमध्ये ५२३ स्टार कासव जप्त

कुर्ल्यातील लोकमान्य टिळक टर्मिनसवर आंध्रप्रदेशहून आलेल्या एका महिला प्रवाशाकडून तब्बल ५२३ दुर्मिळ गोल्डन स्टार कासव जप्त करण्यात आले आहेत. महसूल गुप्तचर संचालनालय, मुंबई, वन्यजीव गुन्हे नियंत्रण विभाग आणि वन विभागाने एकत्रित कारवाई करून कासवांची तस्करी करणाऱ्या या महिलेला गुरूवारी ताब्यात घेतलं.

'असं' घेतलं ताब्यात

मुळात 'डिआरआय'ला सापाच्या कातडीच्या तस्करीची माहिती खबऱ्यांकडून मिळाली होती. त्यानंतर 'डिआरआय'ने 'वन्यजीव गुन्हे नियंत्रण विभाग' आणि वन विभागाच्या मदतीने कुर्ला टर्मिनसमध्ये सापळा रचला. या सापळ्यात तस्करी करणारी महिला संशयाच्या आधारे ताब्यात घेण्यात आली. तिची बॅग तपासली असता, बॅगेतून तब्बल ५२३ दुर्मिळ प्रजातीचे गोल्डन स्टार कासव आढळून आले.

ही महिला तस्कर आंध्र प्रदेशातील पुट्टपर्थी इथून कुर्ला टर्मिनसला आली होती. हे दुर्मिळ कासव ती मुंबईतील मोठ्या व्यापाऱ्याला विकण्यासाठी चालली होती.

दुर्मिळ प्रजाती

वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, हे कासव इंडियन गोल्डन स्टार (जिओकेलेन एलिगंस) नावाने ओळखले जातात. ही कासवाची अत्यंत दुर्मिळ जात असल्याने या जातीला लूप्त होणाऱ्या प्रजातींमध्ये सामील करण्यात आलं आहे.

म्हणून चांगली मागणी

या कासवाच्या पाठिवर सोनेरी रंगाची चांदणी बनलेली असते. त्यामुळे काहीजण या कासवांना शुभ मानून आपल्या घरात पाळतात. तर काहीजण या कासवांचा वापर जादूटोण्यातही करतात. त्यामुळे या कासवांना बरीच मागणी असते. खासकरून आंतरराष्ट्रीय बाजारात महागड्या दरांत या कासवांना खरेदी केलं जातं.

सध्या जप्त करण्यात आलेले कास वन्यजीव विभागाच्या ताब्यात असून त्यांना लवकरच जंगलात सोडण्यात येईल.


हेही वाचा-

एमडीची तस्करी करणारा पोलिसांच्या अटकेत

स्वस्तात सोने देण्याच्या अामिषाने २४ लाख लांबवले; ५ जणांना अटक


पुढील बातमी
इतर बातम्या