न्यायाधिशांच्याच घरी झाली चोरी! चोर महिलेस अटक

कफ परेडमध्ये न्यायधिशाच्या घरातून त्यांची बॅग चोरून एटीएममधून चक्क ६ हजार रुपये काढणाऱ्या महिलेस गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. दीपा तुळवे असे या महिलेचे नाव आहे. मागील अनेक दिवसांपासून दीपा त्यांच्याकडे घरकामासाठी जात असल्याचे कळते. या महिलेने न्यायाधिशांच्या घरातील सोन्याच्या पादुकाही चोरल्याचा संशय असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

एका मेसेजमुळे लागला चोरीचा पत्ता!

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला न्यायाधिशांच्या सर्व्हंट क्वार्टर्समध्ये असताना तिची पर्स गायब झाली होती. त्या पर्समधील एटीएम कार्डच्या सहाय्याने वुड हाऊस रोडवरील एका राष्ट्रीयीकृत बॅंकेच्या एटीएम सेंटरमधून 6 हजार रुपये काढल्याचा मेसेज आल्यानंतर अखेर याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे. कफ परेड पोलिस ठाण्यात भादंवि कलम 380, 419, 420 व माहिती तंत्रज्ञान गैरवापर प्रतिबंधक कलम 66(क) व ड अंतर्गत गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेला वर्ग करण्यात आला आहे.

सोन्याच्या पादुकांचीही चोरी!

या प्रकरणी गुन्हे शाखेच्या प्राथमिक तपासानुसार महिला दीपा तुळवे हिने ती रक्कम काढल्याचे तपासात निष्पन्न झाले. अखेर गुन्हे शाखेच्या कक्ष-1 च्या पोलिसांनी तिला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान तिचा गुन्ह्यात सहभाग आढळल्यानंतर पोलिसांनी अखेर तिला अटक केली आहे. प्राथमिक तपासात न्यायाधिशांच्या घरातील सोन्याच्या पादुकाही चोरी झाल्याचा संशय आहे. यातही आरोपी महिलेचाच सहभाग असल्याचा संशय असून याप्रकरणीही गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेतील सूत्रांनी दिली.


हेही वाचा

मुलुंडमध्ये 'गोलमाल'चा 'उंगलीमॅन'!

पुढील बातमी
इतर बातम्या