लोकलच्या टपाचा प्रवास ठरला जीवघेणा

  • मुंबई लाइव्ह टीम & सोनाली मदने
  • क्राइम

लोकलच्या टपावरून प्रवास करणं धोक्याचं आहे, असं आवाहन रेल्वे प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत असलं, तरी जीवावर उदार झालेले प्रवासी मात्र या आवाहनाकडे दुर्लक्ष करून अन् आपला जीव गमावताना दिसतात. असाच एक प्रकार गुरूवारी दुपारी मस्जिद बंदर स्थानकात घडला. लोकलच्या टपावरून प्रवास करताना एका तरूणाला ओव्हरहेड वायरमधील उच्च दाबाच्या विजेचा जोरदार धक्का बसला. या धक्क्यात तरूण ४० टक्के भाजला. राकेश असं या तरूणाचं नाव असून त्याला सेंट जाॅर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

कशी घडली घटना?

दुपारी बाराच्या सुमारास मध्य रेल्वे मार्गावरील मस्जिद बंदर स्थानकात रेल्वे आली असता एक तरूण अचानक लोकलच्या टपावर चढला. त्यानंतर या तरूणाने थेट ओव्हरहेड वायरलाच हात लावला. तेव्हा तरूणाला ओव्हरहेड वायरमधील २५,००० व्होल्ट क्षमतेच्या वीजप्रवाहाचा जोरदार धक्का बसला.

या विजेच्या धक्क्याने तरूण लोकलच्या टपावरच कोसळला. त्यानंतर रेल्वे स्थानक पोलिस आणि कर्मचाऱ्यांनी त्याला टपावरून उतरवून सीएसएमटी येथील सेंट जाॅर्ज रुग्णालयात दाखल केलं. या घटनेमुळे रेल्वेची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली हाेती. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचं म्हटलं जात आहे.

विजेचा धक्का बसल्यामुळे राकेश ४० टक्के भाजला आहे. तसंच त्याच्यावर वेळेवर उपचार केल्यामुळे त्याची प्रकृती स्थिर आहे.

- मधुकर गायकवाड, अधिष्ठाता, सेंट जाॅर्ज रुग्णालय


हेही वाचा-

अज्ञात व्यक्तीने ओव्हरहेड वायरवर वस्तू फेकली, म.रेल्वेची वाहतूक विस्कळीत


पुढील बातमी
इतर बातम्या