Advertisement

अज्ञात व्यक्तीने ओव्हरहेड वायरवर वस्तू फेकली, म.रेल्वेची वाहतूक विस्कळीत


अज्ञात व्यक्तीने ओव्हरहेड वायरवर वस्तू फेकली, म.रेल्वेची वाहतूक विस्कळीत
SHARES

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी)वरून दादरच्या दिशेने निघालेली धिम्या मार्गावरील खोपोली लोकल भायखळा ते चिंचपोकळी स्थानकादरम्यान ११ वाजेच्या सुमारास आली असता अज्ञात व्यक्तीने या लोकलच्या ओव्हरहेड वायरवर धातूसदृश वस्तू फेकून मारली. यामुळे ओव्हरहेड वायरचा एकमेकांशी संपर्क होऊन जोरदार शाॅर्ट सर्किट झाला. परिणामी दादरकडे जाणारी मध्य रेल्वेवरील वाहतूक २३ मिनिटे विस्कळीत झाली. मात्र रेल्वे कर्मचाऱ्यांनी तात्काळ धाव घेत तांत्रिक अडचण दूर करून सेवा पूर्ववत केल्याची माहिती रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी दिली.


नेमकं काय झालं?

सीएसएमटी स्थानकातून खोपोलीच्या दिशेने निघालेली धिमी लोकल भायखळा ते चिंचपोकळी दरम्यान १०.५६ वाजेच्या सुमारास आली. त्याचवेळेस एका अज्ञात व्यक्तीने भायखळा ब्रिजवरून एक वस्तू ओव्हरहेड वायरच्या दिशेने भिरकावली. ही वस्तू थेट ओव्हरहेड वायरला जाऊन लागल्याने ओव्हरहेड वायरचा एकमेकांशी संपर्क होऊन शाॅर्ट सर्किट झाला. या संपर्कामुळे स्फोटाप्रमाणे दोन-तीन आवाजही आले. यामुळे लोकलमधील प्रवासी घाबरले.

हा प्रकार घडताच मोटरमनने तात्काळ लोकल थांबवली. रेल्वे कर्मचाऱ्यांनी लोकलकडे धाव घेत ओव्हरहेडला चिकटलेली वस्तू दूर काढून वाहतूक सेवा पूर्ववत केली. या दरम्यान धिम्या मार्गावरील वाहतूक किमान २३ मिनिटे विस्कळीत झाली होती. मात्र या प्रकाराने रेल्वेच्या वेळापत्रकाला कुठलाही धक्का लागलेला नसून घटनेचा तपास सुरू असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा