भारताबाहेरील मराठी माणसांसाठी स्पर्धा; जर्मनी, द. कोरिया, सिंगापूर, अमेरिकेतील स्पर्धक ठरले विजेते

मराठी भाषेचा भारताबाहेर प्रसार व प्रचार करण्यासाठी तसंच परदेशात राहणाऱ्या मराठी माणसापर्यंत पोहोचण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मराठी भाषा विभागातर्फे प्रथमच आयोजित केलेल्या विविध स्पर्धांचा निकाल लागला असून या स्पर्धेत जगभरातील ३५ देशातील मराठी व अमराठी नागरिकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

‘हे’ आहेत विजेते

या स्पर्धेत जर्मनीचे ऋषिकेश आपटे, दक्षिण कोरियाचे प्रविणा इंद्रजित बागल, सिंगापूरचे नंदकुमार देशपांडे, अमेरिकेच्या विद्या हर्डीकर सप्रे हे विशेष प्रशस्तिपत्रकास पात्र ठरले आहेत तर जेम्स सिम्पसन आणि जेन वोल्कोव्ह यांना अमराठी विशेष सहभाग म्हणून गौरविण्यात आले आहे.

‘इतक्या’ देशातून प्रतिसाद

स्पर्धेस उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला व सर्व देशातून अनिवासी भारतीयांनी या प्रकारच्या योजनेचं स्वागत केलं. भारताबाहेर स्थित १० पेक्षा अधिक मराठी तसंच महाराष्ट्र मंडळांनी या स्पर्धेचा प्रसार करण्यास मदत केली. एकूण ३५ देशामधील १२४५ अनिवासी भारतीयांपर्यंत या स्पर्धेची माहिती पोहोचली व ११८ लोकांनी प्रतिसाद दिला. अमराठी लोकांनी मराठी भाषा विभागाचे आभार मानले व चित्रफितीद्वारे या स्पर्धेत सहभाग घेतला.

हेही वाचा- प्रथमच मराठीतून होणार 'आरबीआय'ची परीक्षा

‘असा’ घेतला सहभाग

फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, ई मेल तसंच व्हाट्सअपद्वारे लोकांनी या पथदर्शी स्पर्धारूपी प्रकल्पास भरघोस प्रतिसाद दिला. ज्येष्ठ नागरिकांना फेसबुक प्रायव्हसी सेटिंगमध्ये अडचणी येत आहेत असे लक्षात आल्यावर त्यांना विशेष मार्गदर्शन करण्यात आले व ई-मेल तसेच व्हॉट्सअॅप सारख्या सोयीच्या माध्यमातून जास्त लोकसहभाग प्राप्त झाला. काही ठराविक देशात फेसबुक इत्यादी सोशल मीडियावर बंदी आहे, अशा देशातून व्हाॅट्सअपद्वारे संपर्क स्थापन करण्यात यश आले व तेथील स्थानिक नागरिकांनी पुढील प्रकल्पांमध्ये सहभागी करून घ्यावं अशी विनंती केली आहे.

शून्य खर्चात आयोजन

मराठी भाषिक हे जगभरात विखुरलेले आहेत. रा.म.वि.सं, मराठी भाषा विभागातर्फे प्रथमच आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठीचा प्रसार व प्रचार करण्यासाठी स्पर्धा घेण्यात आली. भारताबाहेर स्थित मराठी माणसाला मराठी भाषा विभागाशी जोडण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. अमराठी लोकसुद्धा सहभागी होऊ शकतील अशी तरतूद करण्यात आली होती. या प्रकारच्या आंतरराष्ट्रीय प्रसाराचं पहिलेच वर्ष असल्याने हा प्रकल्प पथदर्शी प्रकल्प म्हणून राबवण्यात आला. शून्य खर्चात पार पडलेल्या या स्पर्धेला पुढच्या वेळी जगभरातील अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्याचं नियोजन करण्यात येत आहे.

हेही वाचा- राज्यात मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करणार- उदय सामंत
पुढील बातमी
इतर बातम्या