एेलोमा, पैलोमा, गणेश देवा..!

  • संचिता ठोसर & मुंबई लाइव्ह टीम
  • संस्कृती

एेलोमा पैलोमा गणेश देवा...

माझा खेळ मांडिला, करीन तुझी सेवा

माझा खेळ मांडिला वेशीच्या दारी...

अशी गाणी म्हणत नवरात्रीत मुंबईत अनेक ठिकाणी महिला भोंडल्याचा फेर धरताना पाहायला मिळतात. नवरात्रीत एकीकडे गरबा-दांडीयाचा उत्साह तर दुसरीकडे मराठमोळ्या महिलांचा पारंपरिक पद्धतीने साजरा होणारा भोंडला, नवरात्रीत वेगळी मजा आणतो. 

पश्चिम महाराष्ट्रात आणि कोकणात प्रचिलत असलेला स्त्रियांच्या सामुदायिक खेळाचा प्रकार म्हणजे भोंडला. गरबा-दांडीयाच्या ट्रेण्डमध्ये भोंडला कुठे तरी हरवून गेला होता. पण आता भोंडला पुन्हा मुंबईसह राज्यभर फेर धरू लागला आहे. घटस्थापनेपासून नवरात्रीच्या ९ दिवसांत संध्याकाळी महिला भोंडल्याचा फेर धरतात, गाणी गातात आणि भोंडल्याचा आनंद घेतात.

'हा' आहे उद्देश

भोंडला 'भुलाबाई' किंवा 'हादगा' या नावानेही ओळखला जातो. पूर्वी महिलांना घराबाहेर पडता येत नसल्याने सणांच्या माध्यमातून महिलांना एकत्र आणण्याचा प्रयत्न व्हायचा. त्यात गाणे आणि खेळ व्हायचे, खेळामुळे शारिरीक व्यायाम व्हायचा. मंगळागौर आणि भोंडला हे याचेच उदाहरण. 

भोंडला नवरात्रीत खेळला जातोच, पण त्याचवेळी मकर संक्रांतीलाही महिला भोंडल्याचा फेर धरतात. भोंडला महिलांसाठी विशेष असतो. त्याचजोडीला भोंडल्यात चिमुकल्या मुलीही सहभागी होतात. आपल्या परंपरेची, संस्कृतीची माहिती मुलींना व्हावी यासाठी मुलींनाही भोंडल्यात सहभागी करून घेतले जात आहे. तेच आजही आपल्याला पाहायला मिळते. 

भोंडल्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे भोंडल्यातील गाणी. दैनंदिन आयुष्यातील छोट्या-मोठ्या गोष्टींवर मजेशीर स्वरूपात ही गाणी रचण्यात आलेली आहेत. मग सासू-सूनेमधला वाद असो वा माहेरवासीनीचे हितगुज, तिला होणार सासुरवास अशा अनेक विषयांवरील गाण्यांचा समावेश या भोंडल्यात असतो. 

'असा' खेळतात भोंडला

नवरात्रीचे नऊ दिवस भोंडला खेळला जातो. एका पाटावर हत्ती काढून त्याची पूजा केली जाते. पाटाभोवती फेर धरला जातो. आणि पारंपारिक भोंडल्याची गाणी म्हटली जातात.

खिरापतीला महत्त्व

जिच्या घरी भोंडला असतो त्या घरी खिरापत तयार केली जाते. खिरापत म्हणजे एक प्रकारे प्रसादच. भोंडला खेळून झाल्यावर बायकांना, मुलींना खिरापत दिली जाते. खिरापत काय असावी यावर बंधन नाही. प्रत्येक जण आपल्या पद्धतीनुसार खिरापत देतो.

पाटावर हत्तीच का ?

नवरात्रीच्या नऊ दिवसात हस्त नक्षत्र असते.  हत्ती हे समृद्धी आणि ऐश्वर्याचे प्रतिक आहे. महालक्ष्मी, लक्ष्मीच्या बाजूला कायम हत्ती असतो. लक्ष्मीची पूजा करताना हत्तीचीही पूजा केली जाते. त्यामुळे महिलांना सासरी, माहेरी ऐश्वर्य प्राप्त व्हावे यासाठी पाटावर हत्ती काढून त्याची पूजा केली जाते. आणि पाटाभोवती फेर धरला जातो.


हेही वाचा -

जागर महिलाशक्तीचा : देवाला देवपण देणाऱ्या कलेचा वारसा जपणारी लेक

जाणून घ्या नवरंगांच्या नवलाईमागचं सत्य!


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

पुढील बातमी
इतर बातम्या