Advertisement

जागर महिलाशक्तीचा : देवाला देवपण देणाऱ्या कलेचा वारसा जपणारी लेक


जागर महिलाशक्तीचा : देवाला देवपण देणाऱ्या कलेचा वारसा जपणारी लेक
SHARES

सुबक अन् भव्य गणेशमूर्तींनी गिरणगावाला जीवंतपणा आणणारे नामांकीत मूर्तीकार विजय खातू यांचे २६ जुलै २०१७ ला हृदयविकाराने आकस्मिक निधन झाले. विजय खातू यांच्या अचानक जाण्याने गिरणगावावर ऐन गणेशोत्सवात शोककळा पसरली होती.   

उन्हाळ्यापासून दसऱ्यापर्यंत कधीही बंद नसणारी खातू यांची कार्यशाळा १ दिवसीय दुखवटा म्हणून पहिल्यांदाच बंद ठेवण्यात आली. खातू यांच्या रुपाने एक खंदा मूर्तीकार हरपल्यानंतर त्यांची कार्यशाळा बंद होणार का? या कार्यशाळेचा डोलारा कोण सांभाळणार? असा प्रश्न सर्वांना पडला होता. परंतु, ऐन उत्सवाच्या काळात वडिलांचे छत्र हरपल्यानंतर त्यांचे अपूर्ण राहिलेले काम आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्व दुःख बाजूला सारून त्यांची मुलगी रेश्मा खातू मोठ्या धाडसाने पुढे आली. 



आपल्या अनुभवाबद्दल रेश्मा सांगते, ''बाबा असताना मी कधीही कार्यशाळेत मूर्तीचे काम पाहण्यासाठी आले नव्हते. मूर्तीकला मला बालपणापासूनच अवगत आहे. पण केवळ हौस आणि छंद म्हणूनच. व्यवसाय म्हणून मी मूर्तीकलेकडे आजवर कधीही पाहिले नाही. बाबा असताना मी कधी विचारही केला नव्हता, की मला पुढे जाऊन कार्यशाळा सांभाळावी लागेल. माझ्यावर ही जबाबदारी अचानक आली. जबाबदारी कशीही आलेली असो येथून पुढे ती उत्कृष्ट रीतीने पार पाडेन, अशी मला खात्री आहे. बाबांनी कधीही मुलगा-मुलगी असा भेदभाव केला नाही. त्यांच्या कामाचा दर्जा आणि वेगळेपण टिकवून ठेवण्याची जबाबदारी आता आमच्यावर आहे.''

मूर्ती कितीही भव्यदिव्य असो तीच्यात जीवंतपणा आणणारे मूर्तीकार दि. विजय खातू यांच्या कामाची स्वतंत्र शैली जपण्याचे काम रेश्मा सध्या करत आहे. त्याशिवाय रेश्मा सहायक दिग्दर्शक म्हणून फिल्ममेकिंग देखील करते. तसे पाहायला गेल्यास आपल्या समाजरचनेत वडिलांच्या पश्चात मुलगा त्यांचा व्यवसाय पुढे सांभाळतो. परंतु, पारंपरिक व्यवसायात पुरुषांची असलेली मक्तेदारी रेश्माने आपल्या निर्णयाने मोडीत काढली, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

गणेशोत्सवात वडिलांचा हात अनेक गणेशमूर्तींना लागल्यामुळे बहुतांश गणेशमूर्तीचे काम शेवटच्या टप्यात आले होते. परंतु नवरात्रीच्या काळात देवीच्या मूर्तींच्या ऑर्डरपासून सर्वच गोष्टी रेश्मा यांना नव्याने हाताळाव्या लागल्या. रेश्माच्या मागे आई, भाऊ, काका असे संपूर्ण कुटुंब मागे खंबीरपणे उभे आहे.

सालाबादप्रमाणे यंदाही खातूंच्या कार्यशाळेत ७.३० फुटांपासून १८ फुटांपर्यंतच्या देवीच्या मूर्ती तयार करण्यात आल्या. या कार्यशाळेत २५ कारागीर काम करतात. बी. पी. वाडिया, चिंचपोकळी, चिराबाजार, गणेश गल्ली या प्रसिद्ध मंडळांच्या देवीच्या मूर्ती खातूंच्या कार्यशाळेत यंदाही घडवण्यात आल्या. नांदेडला पाठवण्यासाठी २ देवी कार्यशाळेत घडवण्यात आल्या. दि. विजय खातू यांच्या पश्चात रेश्मा आपल्या कलेतून कार्यशाळेचे वैभव टिकवून ठेवत आहे.

आम्ही मूर्तीकार आहोत, मंडळांच्या मागणीनुसार आम्ही मूर्ती तयार करतो. त्यामुळे आॅर्डर नोंदवलेल्या मंडळाला हवी तशी मूर्ती बनवून दिल्यास, त्यांच्या चेहऱ्यावरील विलक्षण आनंद आम्हाला समाधान देऊन जातो.
- रेश्मा खातू, मूर्तिकार



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा