कॉलेज बंक आता अशक्य! बायोमेट्रिक हजेरी लावावी लागणार!

अनेक विद्यार्थी कॉलेजला अॅडमिशन घेतात, मात्र हजेरी लावत नाहीत. ते खासगी क्लास लावून परीक्षा देतात. अनेकवेळा कॉलेज आणि क्लासचं साटंलोटं असतं. क्लासमुळे विद्यार्थ्यांची कॉलेजला गैरहजेरी असते. ही गैरहजेरी टाळणं, तसंच खासगी क्लासेसवर नियंत्रण आणण्याची मागणी, सातत्याने होत होती. त्याबाबत आता सरकारने पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे.

खासगी क्लासेसवर नियंत्रण आणण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयात बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्यात येणार असल्याची घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सभागृहात केली. विधानसभेचे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरु असून त्यावेळी तावडेंनी ही घोषणा केली.

शिक्षक आमदार अपूर्व हिरे यांनी खाजगी शिकवण्यांवर नियंत्रण आणण्यासाठी कायदा आणण्याबाबतचा तारांकित प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना विनोद तावडे यांनी ही घोषणा केली.

प्रयोगिक तत्वावर 2015 पासूनच बायोमेट्रिक हजेरी

पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर आणि अहमदनगर महापालिका हद्दीतील महाविद्यालयांना 2015 पासूनच ही योजना लागू करण्याचे आदेश दिले होते. विद्यार्थी नियमितपणे वर्गात न बसणे, अध्यापनाचे काम सरकारी नियमानुसार न होणे, ऑनलाइन अॅडमिशन यादीच्या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये प्रवेश देणे, बोगस पटसंख्या दाखविणे अशा गंभीर बाबी शिक्षण संचलनालयाच्या निदर्शनास आल्या होत्या. त्यांना आळा घालण्यासाठी बायोमेट्रिक हजेरीच्या पहिल्या टप्प्यास सुरुवात करण्यात आली होती.


हेही वाचा

बायोमेट्रिक हजेरी नाही, तर पगार नाही!

पुढील बातमी
इतर बातम्या