१२वी परीक्षेबाबत बाबत १ जून रोजी होणार घोषणा?

देशात कोरोनाची दुसरी लाट आली असली तरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य लक्षात घेता १२ वीची परीक्षा घ्यायलाच हवी, असे मत महाराष्ट्र वगळता बहुतांश राज्यांनी व्यक्त केलं आहे. या परीक्षेबाबत केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक १ जून रोजी महत्त्त्वाची घोषणा करणार आहेत.

१२वीची परीक्षा कशी घ्यावी, याबाबत सीबीएसईनं २ पर्याय मांडले आहेत. तसंच, राज्यांतील शिक्षण मंडळं १२वीच्या परीक्षेबाबत स्वतंत्रपणं निर्णय घेऊ शकतात, असंही सीबीएसईनं म्हटलं आहे. १२ वीच्या परीक्षेबद्दल राज्यांनी आपली मते मंगळवारी, २५ मेपर्यंत केंद्र सरकारला कळवावीत, असं सांगण्यात आलं आहे.

केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्या अध्यक्षतेखाली याबाबत झालेल्या बैठकीला केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, प्रकाश जावडेकर, संजय धोत्रे यांच्यासमवेत विविध राज्यांचे शिक्षणमंत्री उपस्थित होते. कोरोना साथीमुळं १२ वीची परीक्षा न घेता वेगळा मार्ग काढावा, असं मत महाराष्ट्राच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी या बैठकीत व्यक्त केले.

१२ वीची परीक्षा घेण्यापूर्वी सर्व परीक्षार्थींना लस देण्यात यावी, अशी सूचना दिल्ली व केरळच्या राज्य सरकारांनी केली आहे. पश्चिम बंगालनं मात्र १२ वीची परीक्षा रद्द करण्याबाबत अद्याप काहीही ठरविलं नसून, एक आठवड्यानंतर यावर निर्णय घेण्यात येईल असं सांगितलं. १२ वीची परीक्षा होणार की होणार नाही, याविषयी पालक व विद्यार्थ्यांच्या मनात जो गोंधळ निर्माण झाला आहे तो दूर करण्यासाठी विद्यार्थी व शिक्षक यांची सुरक्षा लक्षात घेऊनच योग्य निर्णय लवकरच घेण्यात येईल असे केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी स्पष्ट केलं.


हेही वाचा -

मुंबईतील 'या' आठवड्याचं लसीकरण नियोजन जाहीर

दादर परिसरात टॅक्सी चालकाची हत्या


पुढील बातमी
इतर बातम्या