मुलांना फेरपरीक्षेला बसवूच नका, राज ठाकरेंची पेपरफुटी प्रकरणात उडी

  • मुंबई लाइव्ह टीम & मंगल हनवते
  • शिक्षण

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा(सीबीएसई)च्या पेपरफुटीचा आणि फेरपरीक्षेचा मुद्दा चांगलाच तापलेला असताना आता महाराष्ट्र नवनर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या वादात उडी घेतली आहे. सरकारच्या आणि सीबीएसईच्या अक्षम्य हलगर्जीपणाची शिक्षा मुलांना का? त्यांच्यावर अन्याय का? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे. तसेच, 'सीबीएसईच्या फेरपरीक्षेला मुलांना बसवू नका' असं थेट आवाहनच पालकांना केलं आहे.

पेपरफुटीचा ताण विद्यार्थ्यांच्या डोक्यावर

सीबीएसई बोर्डाचा दहावीचा गणिताचा आणि बारावीचा अर्थशास्त्राचा पेपर फुटला असून आता या दोन्ही पेपरची फेरपरीक्षा होणार आहे. सीबीएसई बोर्डाने हे जाहीर केलं असून या फेरपरीक्षांच्या तारखा मात्र अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. मुलांच्या परीक्षा संपल्या असून आता त्यांच्या डोक्यावर फेरपरीक्षेचा ताण सीबीएसईकडून टाकण्यात आला आहे. त्यामुळे एकीकडे विद्यार्थी नाराज आणि तणावात असून दुसरीकडे पालकांमध्ये सीबीएसईच्या कारभाराबाबत प्रचंड संताप आहे.

हा सरकारचा हलगर्जीपणा - राज ठाकरे

असं असताना आता राज ठाकरे यांनी थेट पालकांनाच आवाहन करत मुलांना फेरपरीक्षेला न बसवण्याचं आवाहन केलं आहे. एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे राज ठाकरे यांनी हे आवाहन केलं आहे. 'सीबीएसईच्या प्रश्नपत्रिका परीक्षेआधीच फुटतात, हा सरकारचा हलगर्जीपणा आहे. स्वत:ची चूक सुधारायची सोडून सरकार विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा कसल्या द्यायला लावतंय?' असंही राज ठाकरे यांनी या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. 

'तुम्ही झुकताय हे जर सरकारच्या लक्षात आलं तर ते तुम्हाला आणखी वाकवायचा प्रयत्न करेल, त्यामुळे तुम्ही निर्णयावर ठाम रहा, सरकारला काय निर्णय घ्यायचा तो घेऊ देत' असं सांगत पालक आणि विद्यार्थ्यांच्या पाठिशी मनसे ठामपणे उभी राहील, असा दावा त्यांनी केला आहे.


हेही वाचा

विद्यार्थ्यांना रसायनशास्त्रामध्ये द्या सरसकट ७ गुण- राष्ट्रवादीची मागणी

पुढील बातमी
इतर बातम्या