दहावी, बारावीच्या परीक्षा मे महिन्यापूर्वी शक्य नाही - वर्षा गायकवाड

दहावी आणि बारावीच्या परीक्षा मे महिन्यापूर्वी शक्य नाही, असं राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे. तसंच २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरु करण्याचा राज्य सरकारचा विचार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

वर्षा गायकवाड म्हणाल्या की, जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर हे पावसाळ्याचे महिने आहेत. म्हणून मे महिन्यात या परीक्षा घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. सप्टेंबरमध्ये निकाल येण्यास उशीर होईल आणि विद्यार्थ्याचं नुकसान होईल. त्या दृष्टीने शाळा सुरु करण्याबाबत आणि दहावी बारावी परीक्षेबाबत मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबत निर्णय घेणार आहेत. 

नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे वर्ग दिवाळीनंतर सुरु करण्याचा विचार असल्याचं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. त्या म्हणाल्या की, दहावी आणि बारावीची परीक्षा फेब्रुवारी-मार्चमध्ये होते. परंतु आता आपल्या सगळ्यांना परिस्थिती माहित आहे. शक्य असल्यास २३ नोव्हेंबरपासून नववी, दहावी, अकरावी आणि बारावीचे वर्ग सुरु करावेत अशी विनंती आम्ही मंत्रिमंडळाला केली आहे. ही मुलं मोठी आहे, त्यामुळे सोशल डिस्टन्स, मास्कचे नियम पाळले जातील. संख्या जास्त असेल तर दोन वेळेला बोलवण्यात येईल किंवा दिवसाआड बोलवता येईल. २५  टक्के अभ्यासक्रम कमी केल्याने तसं दडपण कमी आहे.


हेही वाचा - 

यंदा फटाक्यांच्या विक्रीवर पोलिसांची करडी नजर; बेकायदा स्टॉलवर होणार कारवाई

बेकायद रेल्वे प्रवास करणाऱ्यांकडून १ कोटींचा दंड वसूल


पुढील बातमी
इतर बातम्या