१०वी-१२वीच्या उत्तरपत्रिका शिक्षक घरीच तपासणार

जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसमुळं राज्याच्या शिक्षण मंडळानं विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं इयत्ता १ली ते ८वीच्या परिक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. तसंच, १० वीचा पेपरही पुढे ढकलला. यासोबतचं आता राज्य शिक्षण मंडळानं शिक्षकांना दिलास देणारा निर्णय घेतला आहे. कारण आता शिक्षकांना १०वी व १२वीच्या उत्तरपत्रिका घरीच तपासता येणार आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं निर्णय घेतला आहे. 

करोनाच्या पार्श्वभूमीवर १०वी-१२वीच्या उत्तरपत्रिका शिक्षकांना घरीच तपासण्यासाठी परवानगी देण्याचा निर्णय मंडळानं घेतला आहे. यासंदर्भात एक पत्रक मंडळानं जारी केलं आहे. महाराष्ट्रात संचारबंदी लागू झाल्यानंतर चिंतेत असलेल्या शिक्षकांना राज्य सरकारनं मोठा दिलासा दिला आहे. १०वी-१२वीच्या उत्तरपत्रिका तापसणीवरून सुरू असलेल्या गोंधळावर शिक्षण विभागानं हा तोडगा काढला आहे. 

१२वीची परीक्षा १८ फेब्रुवारी २०२० ते १८ मार्च २०२० दरम्यान पार पडली होती. तर १०वीची परीक्षा ३ मार्च २०२० ते २३ मार्च २०२० दरम्यान पार पडणार होती. मात्र, कोरोनामुळं १०वीचा शेवटचा भूगोलाचा पेपर पुढे ढकलण्यात आला. मात्र असं असलं तरी उत्तपत्रिकांच्या मूल्यांकनाचं काम सुरु करण्यासंदर्भात बोर्डाने महत्वाची घोषणा केली. 

'राज्यातील करोनाचा प्रार्दुभाव वाढत असल्याचं चित्र दिसत आहे. त्यामुळं खबरदारीचा उपाय म्हणून माध्यमिक शाळा आणि उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांना सुट्टी देण्यात आलेली आहे. त्यामुळं शाळेत येऊन उत्तपत्रिकांचं परीक्षण आणि नियमन करण्यात अडचणी येत आहेत. याच पार्श्वभूमीवर दोन्ही परीक्षांचे निकाल वेळेत लागणं आवश्यक असल्यानं या परीक्षेच्या उत्तरपत्रिका काही अटी आणि शर्तीसहीत शिक्षकांना घरी देण्याचे आदेश सरकारनं दिले आहेत. त्यानुसार, या आदेशाचे पालन करत उत्तरपत्रिका घरी देण्याचा निर्णय घेतला आहे', असं बोर्डानं जारी केलेल्या पत्रकामध्ये म्हटलं आहे.

बोर्डाच्या शिक्षकांना अटी?

  • ही परवाणगी केवळ या परीक्षेच्या उत्तरपत्रिकांपूर्ती देण्यात आली आहे.
  • देण्यात आलेल्या उत्तपत्रिका मोजून आणि सुस्थितीमध्ये असल्याची खात्री करुन शिक्षकांनी मुख्याध्यापकांकडून किंवा कनिष्ठ महाविद्यालयाच्या संबंधित प्रमुखांकडून ताब्यात घ्याव्यात.
  • उत्तरपत्रिकांचे परिक्षणक आणि नियमन घरातून करताना त्याची पूर्णत: गोपनीयता आणि सुरक्षिता राखली जाईल याची संबंधित शिक्षकांनी दक्षता घ्यावी.
  • उत्तरपत्रिकांचे परीक्षण किंवा नियमन वेळेत पूर्ण करुन त्या विहित पद्धतीने गोपनीयता व सुरक्षितता विचारात घेऊन संबंधितांकडे हस्तांतरीत कराव्यात.
  • आपल्याकडील उत्तरपत्रिका खराब होणार नाही अथवा गहाळ होणार नाही याची सर्वोतोपरी दक्षता शिक्षकांनी घ्यावी.


हेही वाचा -

संचारबंदीचा गुढीपाडव्याच्या बाजाराला फटका

रस्त्यावर थुंकल्यानं महापालिकेची ११५ जणांवर कारवाई


पुढील बातमी
इतर बातम्या