अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरूवात

  • मुंबई लाइव्ह टीम & नम्रता पाटील
  • शिक्षण

अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला गुरुवारी १० मे पासून सुरू करण्यात आली आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होईपर्यंत ऑनलाईन प्रवेश अर्जाचा एक भाग विद्यार्थी भरू शकणार आहेत. यासाठी सर्व शाळांनी योग्य ते नियोजन करावं, असं आदेश शिक्षण उपसंचालकांनी सर्व मुख्याध्यापकांना दिले आहेत.

असा भरा प्रवेश अर्ज

अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश अर्जाचा भाग १ भरण्यासाठी गुरुवारपासून सुरुवात होत आहे. यासाठी विद्यार्थ्यांना दिल्या गेलेल्या माहिती पुस्तिकेतील युजर आयडी आणि पासवर्डचा वापर करून हा अर्ज भरता येईल.

 http://mumbai.11thadmission.net या वेबसाईटवर सर्व माहिती उपलब्ध करण्यात आली आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांचा अर्ज भरताना त्या विद्यार्थ्याचा परीक्षेचा बैठक क्रमांक टाकल्यानंतर राज्य मंडळाकडे उपलब्ध असणारी सर्व माहिती त्याच्या प्रवेश अर्जात आपोआपच भरली जाईल. जर विद्यार्थ्यांना या माहितीत काही बदल करायचा असेल तर करेक्शन रिक्वेस्ट या ऑप्शनवर क्लिक करून त्या ठिकाणी बदल करता येईल. विद्यार्थ्यांना बदल केलेल्या माहितीची कागदपत्रे संबंधित शाळेत द्यायची आहेत.

याची जबाबदारी मुख्यध्यापकांवर

१० मे पासून दहावीचा निकाल जाहीर होईपर्यंत विद्यार्थी आणि पालकांना शाळेतच ऑनलाईन प्रवेश अर्जाचा भाग १ भरण्याची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. हा अर्ज भरून घेण्याची जबाबदारी पूर्णत: शाळेच्या मुख्याध्यापकांवर असणार आहे. वैधानिक आणि विशेष आरक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी शाळांमध्ये जाऊन अर्ज मंजूर करून घेणे बंधनकारक आहे. अर्जाचा भाग-१ मंजूर झाल्यानंतर, राज्य मंडळाचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना अर्जाचा भाग-२ भरता येणार आहे.

मुंबईबाहेरील विद्यार्थ्यांसाठी सूचना

राज्य मंडळाव्यतिरिक्त इतर मंडळांच्या शाळांनीही दहावीचा निकाल जाहीर होईपर्यंत शाळास्तरावर नियोजन करून प्रवेश अर्ज भरून घ्यावेत, असंही या परिपत्रकात नमूद करण्यात आलं आहे. मुंबई महानगर क्षेत्राबाहेरील विद्यार्थ्यांनी निकाल जाहीर झाल्यानंतर पुढील १० दिवसांत ऑनलाइन अर्जाचा भाग-१ आणि भाग-२ भरण्याकरता मार्गदर्शन केंद्रावर जावे, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.


हेही वाचा - 

आयसीएसईचा दहावी-बारावीचा निकाल सोमवारी

पुढील बातमी
इतर बातम्या