भारतीय शिक्षण संस्थानी जागतिक स्पर्धेसाठी सज्ज व्हावं- राज्यपाल

  • मुंबई लाइव्ह टीम & नम्रता पाटील
  • शिक्षण

उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात विकसित देशांसोबत स्पर्धा करण्यासाठी आपल्या शैक्षणिक संस्था तसंच विद्यापीठांनी संशोधन आणि विविध क्षेत्रात नाविन्यपूर्ण शोधकार्य करण्याची गरज आहे. आपल्या शिक्षण संस्थांचे बळकटीकरण करण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनीही हातभार लावावा, असं आवाहन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केलं.

स्वायत्त संस्थेचा दर्जा

सायन येथील साऊथ इंडियन एज्युकेशन सोसायटी (एसआयइएस) च्या आर्ट्स, सायन्स आणि कॉमर्स कॉलेजला विद्यापीठ अनुदान आयोगाकडून स्वायत्त संस्थेचा दर्जा देण्यात आला असून या संस्थेला त्याबाबतचं प्रमाणपत्र राज्यपालाच्या हस्ते नुकतंच देण्यात आलं. त्याचसोबत कॉलेजच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या प्रा. रामनाथन ग्रंथालयाचं आणि प्रयोगशाळेचं उद्घाटनही राज्यपालांच्या हस्ते झाले.

यावेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर, एसआयईएसचे अध्यक्ष व्ही. शंकर, उपाध्यक्ष एस. गणेश, कॉलेजच्या प्राचार्य डॉ. उमा माहेश्वरी शंकर आदी उपस्थित होते.

इतर देशांच्या विकासात भर

उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात पहिली २०० विद्यापीठं व संस्थांमध्ये बहुतांश विकसित देशांमधील संस्था, विद्यापीठांचा समावेश आहे. जगातील नामांकित विद्यापीठे आणि संस्था देशातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आकर्षित करून घेत आहेत. यामुळे बुद्धिमत्ता असलेले आपले तरूण इतर देशांच्या विकासात भर घालत आहेत. हे चित्र बदलण्यासाठी येथील विद्यापीठ आणि संस्थांनी जागतिक दर्जाच्या शैक्षणिक सुविधा पुरविण आवश्यक आहे, असं ते यावेळी म्हणाले.

या कार्यक्रमात माजी प्राचार्य प्रा. व्ही. पद्मनाभन, डॉ. हर्षा मेहता तसेच सध्याच्या प्राचार्या प्रा. माहेश्वरी यांचा महाविद्यालयाच्या विकासात मोलाचे योगदान दिल्याबद्दल सत्कार करण्यात आला.


हेही वाचा-

'महा आयटीआय' अॅप लय भारी, सरकारनं घेतली दखल

'आयटीआय' प्रवेशाचं वेळापत्रक का झालं रद्द? वाचा...


पुढील बातमी
इतर बातम्या